आ.राजूमामा भोळेंनी मागितली महासभेच्या इतिवृत्ताची माहिती

0

जळगाव । दि.11 । प्रतिनिधी-जळगाव शहराच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांनी 25 कोटी रुपयाचा निधी दिला आहे. परंतु हा निधी मनपाकडून बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे.

त्यामुळे दि.9 रोजी झालेल्या महासभेत रमेशदादा जैन यांनी आमदार, खासदार निधीतील कामांना मनपा मंजूरी देणार नाही असे वक्तव्य केले.

त्यामुळे आ.राजूमामा भोळे यांनी मनपाच्या नगरसचिव विभागाला पत्र देवून महासभेच्या इतिवृत्ताची माहिती मागविली आहे.

मुख्यमंत्री अडीच वर्षापूर्वी जळगावात आले असता शहराच्या विकासासाठी 25 कोटीची घोषणा केली होती. त्यानुसार निधी प्राप्त झाला आहे.

परंतु या निधीतून सार्वजनिक बांधकाम विभाग की, मनपाने कामे करावी, याबाबत तिढा होता. त्यानंतर कामे करण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत झाली.

25 कोटीच्या निधीतून सार्वजनिक बांधकाम विभागाने कामे करावी, अशी मागणी आ.राजूमामा भोळे यांनी केली होती. त्यानुसार जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेला निधी पुन्हा जिल्हा प्रशासनाकडे वर्ग झाला असून बांधकाम विभागाच्या माध्यमातून कामे केली जाणार आहे.

दरम्यान दि.9 रोजी महापालिकेची महासभा झाली. या महासभेत खाविआचे नेते रमेशदादा जैन यांनी महापालिकेच्या विकासासाठी प्राप्त झालेल्या 25 कोटी रुपयाच्या निधीतील कामे बांधकाम विभागाकडून नव्हे तर महापालिकेकडून करावी, अशी मागणी केली.

जर कामे बांधकाम विभागाकडून केली तर यापूर्वी आमदार, खासदार निधीतील कामांना मनपा मंजूरी देणार नाही असे वक्तव्य केले. या वक्तव्यामुळे माजीमंत्री आ.एकनाथराव खडसे, आ.राजूमामा भोळे यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला.

तर भाजपच्या नगरसेवकांनी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देखील दिले आहे. दरम्यान, आ.राजूमामा भोळे यांनी महासभेच्या इतिवृत्ताची माहिती मागविली असून नगरसचिव विभागाकडे अर्ज देखील दिला आहे.

LEAVE A REPLY

*