जिल्ह्यातील 800 कोटीची विकासकामे ठप्प

0
जळगाव । दि.11 । प्रतिनिधी – प्रगतीत असलेल्या शासकीय विकास कामांसाठी शासनाने 18 टक्के जीएसटी लावल्याने त्याचा आर्थिक भुर्दंड कंत्राटदारांना सहन करावा लागत आहे.
त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शासकीय कंत्राटदारांनी विकासकामे करण्यावर टाकलेला बहिष्कार अद्यापही कायम ठेवला असुन याबाबत दि. 14 रोजी पालकमंत्री ना. चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्याचा निर्णय आज पद्मालय विश्रामगृह येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

जिल्हा कंत्राटदार संघटना व बिल्डर्स असोसिएशनची दुसरी बैठक आज पद्मालय विश्रामगृह येथे पार पडली. शासनाने 1 जुलैपासून जीएसटी लागू केला आहे. प्रगतीत असलेल्या शासकीय कामांवर देखील हा कर लागू राहणार आहे.

प्रत्यक्षात प्रगतीत असलेल्या कामांचे निविदा दर व्हॅट कर प्रणालीवर आधारीत होते. मात्र जुलैपासून जीएसटी लागू झाल्याने जुन्या कामांवरही अचानक 18 टक्के जीएसटी लावण्यात आला आहे.

या जीएसटी करामुळे शासकीय कंत्राटदारांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. त्यामुळे संपुर्ण देशातील कंत्राटदार व बिल्डर्स यांनी याविरोधात आंदोलन पुकारले आहे.

जळगाव जिल्हा कंत्राटदार संघटना व बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया यांनीही प्रगतीत असलेल्या कामांसह नविन कामे करण्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. तसेच जोपर्यंत जीएसटीबाबत सकारात्मक निर्णय होत नाही तोपर्यंत विकास कामे बंदच राहतील, असा इशाराही दिला आहे. याबाबत दि.14 रोजी पालकमंत्री ना.चंद्रकांत पाटील यांची भेट घेवून निवेदन देण्याचाही निर्णय बैठकीत घेण्यात आला.

800 कोटींची कामे ठप्प
जिल्ह्यातील शासकीय कंत्राटदारांनी सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा, मनपा, पाणीपुरवठा, जलसंधारण, कृषी, वन या विभागामार्फत करण्यात येणार्‍या सर्व शासकीय कामांवर बहीष्कार टाकल्याने जिल्ह्यात तब्बल 800 कोटीची विकासकामे ठप्प झाल्याचा दावा कंत्राटदार संघटनेने केला आहे. आजच्या बैठकीत अभिषेक कौल यांनी याबाबत भुमिका विषद केली. बैठकीला संघटनेचे जिल्हाध्यक्ष विलास पाटील, सचिव आर.जी. पाटील, बिल्डर्स असोसिएशनचे अध्यक्ष संजय पाटील, सचिव अभिषेक कौल, अनिल भाईदास पाटील, सुनील पाटील, मिलींद अग्रवाल, अभिषेक पाटील, विकास महाजन, एल.एच.पाटील, शिवाजी भंगाळे, आर.के. शर्मा, तुषार बोरसे, बी.पी. पुन्शी, सुरेश अग्रवाल, तुषार महाजन, राहुल देशमुख, सुधाकर कोळी, संदीप भोरटक्के, अमोल कासट आदींसह 250 कंत्राटदार उपस्थित होते.

 

 

LEAVE A REPLY

*