अनुभूतीच्या ‘संगीत संध्या’मध्ये विद्यार्थी मंत्रमुग्ध

0
जळगाव |प्रतिनिधी  :  अनुभूती इंटरनॅशनल निवासी शाळेचे दशकपूर्ती वर्ष सुरू आहे. या निमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. याचाच एक भाग म्हणून नुकतेच ‘संगीत संध्या’ चे आयोजन करण्यात आले होते. शाळेतील माजी विद्यार्थी सागर नाथवाणी याच्या‘सेवन सिझन’ गृपने सांगीतिक मेजवानी दिली.

जुन्या व नव्या हिंदी गाणी सादर केली. सेवन सिझन गृपने सादर केलेल्या संगीतांमुळे रसिक विद्यार्थी मंत्रमुग्ध झाले.

भवरलाल जैन तथा मोठेभाऊ यांनी विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकीय संस्कार निर्माण व्हावेत यासाठी अनुभवावर आधारीत शिक्षण प्रणालीचा प्रयोग अनुभूती निवासी शाळेत केला. या शाळेचे हे दशकपूर्तीवर्ष सुरू आहे. त्यामुळे शाळेत वर्षभर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन होत असते. त्याचाच भाग म्हणून ‘संगीत संध्या’ चे आयोजन करण्यात आले होते.

अनुभूती शाळेचा माजी विद्यार्थी व सध्या मुंबईत शिक्षण घेत असलेला सागर नाथवाणी याने स्वतः निर्माण व दिग्दर्शित केलेला ‘सेवन सिझन’ या गृपने संगीताचा कार्यक्रम सादर केला.

‘सेवन सिझन गृप’ ने जुन्या, नव्या हिंदी गाण्यांचे सादरीकरण केल्याने रसिक विद्यार्थी चिंब झाले. सागर नाथवाणी दिग्दर्शित या ‘सेवन सिझन’ मधे यश सोलंकी, राज बारोट, राजीव त्रिपाठी, रिषभ गिरी या कलावंतानी सहभाग घेतला.

सागर नाथवाणी याने ड्रम, तीन वेगळया प्रकारच्या गिटार, झाम्बे, तर्बुका, रोटो, ढोलक, ढोल यासह अनेक वाद्यांचा परिचय व महत्त्व विद्यार्थ्यांना सागरने सांगितले. तसेच ‘दादाजी आदरणीय भवरलाल जैन यांच्या स्वयं प्रेरणा व उद्द्यमशील बना या विचारालाच आपले ध्येय मानून आपण समाजाचे देणं लागतो या भावनेतून मी माझी वाटचाल करीत आहे.

एक कृतज्ञता म्हणून माझ्या शाळेत कार्यक्रम सादर करीत असल्याचे’ सागरने स्पष्ट केले. पुढे आपल्या आठवणींना उजाळा देत तो म्हणाला ‘शाळेत असतांना कधी टेबल, प्लास्टिकची बादली, पेन अशा मिळेल त्यावस्तूंनी आपली कला सादर करायचो, असे म्हणत अनुभूतीने मला वेळोवेळी स्टेज उपलब्ध करुन दिल्यानेच मी स्वतःचा गृप निर्माण करु शकलो असे मनोगत व्यक्त केले.

विद्यार्थीदशेपासूनच त्याला संगीताची आवड होती. मेहनत व इच्छाशक्तीच्या बळावर सागर मोठा होईल व स्वतः सोबतच शाळेचे नाव उज्वल करेल, असे मत संचालिका सौ. निशा जैन यांनी यावेळी व्यक्त केले.

नाथवाणी गृपने सादर केलेल्या ढोलक व ड्रम यांच्या विशेष जुगलबंदीला रसिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त दाद दिली. याप्रसंगी प्राचार्य जे. पी. राव, मनोज परमार आणि शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*