जळगाव । दि.9 । प्रतिनिधी-उपनगरातील पिंप्राळा येथील कुंभारवाड्यात मातीच्या घराचे छत कोसळून ढिगार्‍याखाली दाबल्या गेल्याने 55 वर्षीय महिलेचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली.

याबाबत प्रत्यक्षदर्शीकडून मिळालेली माहिती अशी की, पिंप्राळयातील कुंभारवाडयात अशोक ननसिंग पाटील यांचे घर असून त्याठिकाणी ते गेल्या 15 वर्षापासून त्याच्या पत्नी सुमित्रा पाटील, आई भिकुबाई पाटील, मुलगी राजश्री पाटील, भाचा गणेश पाटील हे राहतात.

नेहमीप्रमाणे सकाळी सुमित्राबाई घरात चहा बनवित होत्या. यावेळी त्यांच्या सासु भिकुबाई पाटील घरात झोपल्या होता. घरातील बाकी मंडळी घराबाहेर होते.

सुमित्रा पाटील

याचवेळी घराचे छत अचानक कोसल्याने ढिगार्‍याखाली सुमित्रा पाटील दबल्या गेल्या.त्याच्या सासु भिकूबाई यांच्या हाताला दुखापत झाली.

घटना कळताच परिसरातील नागरिक व कुटुंबियांनी धाव घेत ढिगार्‍याखालून सुमित्राबाईंना काढले व तात्काळ खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

यावेळी डॉक्टरांनी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिल्याने जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. याठिकाणी वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्यांना मयत घोषित केले.

चहा पिण्यापूर्वीच काळाची झडप
सकाळी नेहमीप्रमाणे सुमित्राबाई घरात चहा बनवित होत्या. यावेळी अचानक घराचे छत कोसळून त्या ढिगार्‍याखाली दाबल्या जावून त्याचा मृत्यू झाला.

चहा पिण्यापूर्वीच या महिलेवर काळाने झडप घातल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत होती. घटनेची माहिती कळताच तहसिलदार यांनी घटनास्थळी भेट देवून घटनेचा पंचनामा करीत कुटुंबियांचे सात्वंन केले. यावेळी मदत मिळवून देण्याचेही आश्वासन तहसिलदारांनी दिले असल्याचे समजते.

सुदैवाने तिघे बचावले
या दूदैवी घटनेत सुमित्राबाई यांचा मृत्यू झाला. सुदैवाने सुमित्राबाई यांच्या सासु भिकुबाई पाटील, मुलगी राजश्री पाटील व भाचा गणेश पाटील सुदैवाने बचावले आहे. या घटनेत भिकुबाई पाटील यांच्या हाताला दुखापत झाली आहे.

 

LEAVE A REPLY

*