दारुबंदी विरोधात महिलांचा ‘एल्गार’

0
जळगाव । दि.8 । प्रतिनिधी-तालुक्यातील नांद्रा येथील महिलांनी गावात दारुबंदीच्या विरोधात आज नांद्रा ते जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पायी मोर्चा काढूनजिल्हाधिकारी यांची भेट घेतली.
यावेळी ग्रामस्थांनी तात्काळ दुकान बंद करण्याचे आदेश देण्यात यावे अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

मौजे नांद्रा गावी दारू बंदीच्या विरोधात मतदान प्रक्रिया राबविण्यात आली होती. यावेळी गावातील 74 टक्के महिलांनी दारुबंदीच्या विरोधात मतदान केले होते.

तरी देखील गावात दारु विक्री सुरु आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक दहीवडे यांच्या उपस्थितीत ग्रामसभा घेवून देशीदारु दुकान बंद करण्याबाबत ग्रामपंचायतीने ठराव मंजुर केला होता.

याबाबत व्हीडीओ सीडी व ठराव जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आला होता. तरी देखील देशीदारू विक्री सुरु आहे. याबाबत ग्रामपंचायतीमार्फेत सेच गावातील महिलांनी केलेल्या तक्रारीची कुठलीही दखल न घेण्यात आल्याने संतप्त ग्रामस्थांनी आज नांद्रा ते जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पायी पदयात्रा काढून देशी दारू विक्रीचे दुकान बंद करण्यात यावे अशी मागणी केली.

गावातील 651 महिलांनी दारूबंदीच्या विरोधात मतदान केले.दारूबंदीचा ठराव ग्रामपंचायतमध्ये मंजुर असतांना देखील दारु विक्री सुरु आहे.

संपूर्ण गावाला देशी दारू दुकान नको हवे आहे तर मग ते चालू का आहे? देशी दारु दुकान बंदला कोणाचा विरोध नसतांना देखील का बंद करण्यात येत नाही? असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे उपस्थित केला आहे.

कारवाई करण्याचे जिल्हाधिकारी यांचे आश्वासन
दोन दिवसात चौकशी करून कारवाई करण्यात येईल असे आश्वासन जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी नांद्रा ग्रामस्थ व महिलांना दिले. त्यांनतर मोर्चेकरी ग्रामस्थ गावाकडे परतले.

.. तर दोन दिवसांनंतर दुकानाची तोडफोड
दारू बंदीचा ठराव असतांना गावात देशी दारू विक्री होत आहे. या देशी दारू विक्री करणार्‍यावर दोन दिवसात कारवाई करा अन्यथा दुकाना तोडफोड करण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला.

 

LEAVE A REPLY

*