बसस्थानकावर महिलेची मंगलपोत तोडून पाच ग्रॅम सोने लंपास

0

जळगाव । दि.8 । प्रतिनिधी-बसस्थानकावर आलेल्या महिलेच्या गळयातील मंगलपोत तोडून अज्ञात चोरटयाने त्यातील पेंडल, वाट्या व मणी असे पाच ग्रॅम सोने लांबवून नेल्याची घटना दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास घडली.

दरम्यान महिलेला बसमध्ये बसल्यावर बसमधील प्रवाश्यांवर संशय आल्याने बस जिल्हापेठ पोलिस स्टेशनला नेण्यात आली आली होती. या ठिकाणी बसमधील सर्व प्रवाश्यांची तपासणी होवून बस यावलकडे मार्गस्थ झाली.

याबाबत प्रत्यक्ष महिलेने व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, खोटेनगर मधील वंदना साहेबराव बिर्‍हाडे या दुपारी यावल तालुक्यातील मनवेल येथे रक्षाबंधनानिमित्त भावांकडे जाणासाठी बसस्थानकावर आल्या.

काहीवेळ त्या बसची वाट पाहत बसस्थानकातच थांबून होत्या. त्यानंतर वंदना बिर्‍हाडे या एमएच 19 बीटी 1873 क्रमांकाच्या जळगाव- यावल बसमध्ये चढल्या.

 

यावेळी त्याच्या पायाजवळील बॅग बसच्या वरील बाजूस असलेल्या जागी ठेवण्यासाठी खाली वाकल्या असता. त्यांच्या गळातील मंगलपोत तुटून खाली पडली.

या पोतमधील सोन्याचे पेंडल, वाट्या व मणी गायब झाल्याचे दिसून आल्याने कोणीतरी मंगलपोत तोडून सोने चोरून नेल्याचा संशय आला.

यावेळी बिर्‍हाडे यांनी बसवाहकाला हा प्रकार सांगितला. काहीवेळ बसस्थानकावर हा प्रकार सुरु असल्यानेच जिल्हापेठ पोलिस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

त्यानंतर बस जिल्हापेठ पोलिस स्टेशनला नेण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रवासी असलेली जळगाव- यावल बस जिल्हापेठ पोलिस स्टेशनला नेण्यात आली.

यावेळी बिर्‍हाडे यांना काही प्रवाश्यांवर संशय आला. यावेळी जिल्हापेठ पोलिस स्टेशनचे अधिकारी व कर्मचार्‍यांनी बस व बसमधील सर्व प्रवाश्यांची तपासणी केली. परंतू पोलिसांना काहीही मिळून आले नाही. काही वेळानंतर बस यावलकडे मार्गस्थ झाली.

पोलिसात गुन्हा दाखल नाही
बसची तपासणी झाल्यानंतर वंदन बिर्‍हाडे तक्रार देण्यासाठी विचारले असता, पोलिसांनी चोरी झालेल्या दागिन्यांच्या पावत्या आणा, त्यानंतर गुन्हा दाखल करू असे सांगितले. त्यामुळे बिर्‍हाडे तक्रार न देता पोलिस स्टेशनवरुन निघून गेल्या.

पाच दिवसांत दागिने लांबविल्याची चौथी घटना
गेल्या पाच दिवसांत दागिने लांबविल्याची आजची ही चौथी घटना असून शुक्रवारी सागरपार्क चौकात पोलिस असल्याचे सांगत वृध्दाच्या जवळील 32 हजार रुपये किंमतीच्या दोग अंगठया लांबवून नेल्याची घटना घडली होती.

त्याच दिवशी शिवकॉलनीत एका संमोहीत करून त्याच्या जवळील 10 हजारांचे दागिने लांबविले होते. दि.7 रोजी शिवकॉलनीच्या शंभरफुटी रस्त्यावर मॉर्निंग वॉकला जाणार्‍या वृध्द महिलेची 10 ग्रॅमची पोत चोरटयाने लांबविली होती.

आज बसस्थानकावर महिलेची पोत तोडून 5 गॅ्रमचे पेंडल, वाट्या व मणी लांबविल्याची घटना घडल्याने चोटरटयांकडून वृध्दसह महिलांना टार्गेट केले जात असल्याचे दिसून येत आहे.

 

LEAVE A REPLY

*