जिल्हा बँकेच्या बैठकींना ना.महाजन सहा महिन्यांपासून अनुपस्थित

0
जळगाव । दि.15 । प्रतिनिधी – संत मुक्ताई शुगर अ‍ॅण्ड एनर्जी कारखान्यास जिल्हा बँकेने मंजूर केलेले 51 कोटी 25 लाखाचे कर्ज कायदेशीर आहे.
जिल्हा बँकेचे संचालक झाल्यानंतर सहा महिन्यांपासून जलसंपदामंत्री ना.गिरीष महाजन हे बँकेच्या एकही बैठकीला हजर राहिले नसतांनाही त्यांनी विरोध दर्शविणारे पत्र देण्याची गरज काय? असा सवाल जिल्हा बँकेचे व्हाईस चेअरमन आ.किशोर पाटील यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.
ना.महाजन यांनी कर्ज मंजूरीला पत्र दिल्याने ना.महाजन व आ.एकनाथराव खडसे यांचे वाद पुन्हा चव्हाट्यावर आले आहेत.

जिल्हा बँकेने संत मुक्ताई शुगर अ‍ॅण्ड एनर्जी कारखान्यास 51 कोटी 25 लाखाचे कर्ज मंजूर केले आहे. परंतु या कर्जाला जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांनी विरोध नोंदविला आहे.

याबाबत ना.महाजन यांनी बँकेच्या कार्यकारी संचालकांना पत्र दिले आहे. त्यामुळे या भूमिकेबाबत व्हाईस चेअरमन आ.किशोर पाटील यांना विचारले असता ते म्हणाले की, जिल्हा बँकांना सक्षम होण्यासाठी मध्यम मुदतीचे कर्ज देण्याशिवाय पर्यायी नाही.

फक्त ते पात्र कर्जदारास दिले पाहिजे. संत मुक्ताई शुगर अ‍ॅण्ड एनर्जी कारखान्यास दिलेले कर्ज हे सहकार कायद्याच्या अधीन राहून दिले आहे.

त्यामुळे दिलेले हे कर्ज कायदेशीर असल्याचेही आ.पाटील यांनी सांगितले. तसेच ना.गिरीष महाजन हे बँकेच्या एकाही बैठकीला हजर राहिले नसल्याची नाराजी देखील व्यक्त केली.

पत्रकार परिषदेत जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

*