मनपाला खंडपीठाचे आदेश प्राप्त

0
जळगाव । दि.26 । प्रतिनिधी-मनपा मालकीच्या 28 पैकी 18 व्यापारी संकुलातील 2175 गाळ्यांची मुदत दि.31 मार्च 2012 मध्ये संपुष्टात आली आहे.
गाळेप्रकरणी दाखल याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दि.14 जुलै रोजी कामकाज झाले होते. दरम्यान औरंगाबाद खंडपीठाचे आदेश मनपाला प्राप्त झाले असून गाळे ताब्यात घेण्याची प्रक्रिया दोन महिन्यात पूर्ण करावी, असे आदेशात म्हटले आहे. त्यामुळे लवकरच ही प्रक्रिया सुरु केली जाणार आहे.
मनपा मालकीच्या 28 व्यापारी संकुलांपैकी 18 व्यापारी संकुलाची मुदत दि.31 मार्च 2012 रोजी संपुष्टात आली आहे. त्यामुळे गाळे पुन्हा कराराने देण्याबाबत 135 क्रमांकाचा ठराव करण्यात आला होता.

परंतु काही गाळेधारकांनी त्या ठरावावर हरकत घेतली. कराराची मुदत संपल्यानंतरही गेल्या पाच वर्षापासून गाळेधारकांच्याच ताब्यात गाळे आहे.

गाळे ताब्यात घेण्यासाठी तत्कालीन आयुक्त संजय कापडणीस यांनी 81 ब ची प्रक्रिया सुरु करुन गाळेधारकांना नोटीस बजावली होती.

परंतु या नोटीसच्या विरोधातही गाळेधारकांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. तसेच मनपाची आर्थिक स्थिती बिकट असल्यामुळे गाळे ताब्यात घ्यावे यासाठी डॉ.राधेश्याम चौधरी व हिरालाल पाटील यांनी जनहित याचिका दाखल केली.

फुले मार्केटसह चार मार्केटच्या मालकीबाबत आणि अटी-शर्तीचे भंग केल्यामुळे व्यापारी संकुलाची जागा ताब्यात का घेवू नये? यासाठी जिल्हाधिकार्‍यांनी बजावलेल्या नोटीसच्या विरोधात राखीताई सोनवणे तसेच हिरालाल पाटील, सुनिल महाजन यांनी याचिका दाखल केली होती.

मुदत संपलेल्या व्यापारी संकुलातील गाळ्यासंदर्भात दाखल झालेल्या चार याचिका एकत्रित करुन खंडपीठात दि.14 जुलै रोजी कामकाज होवून निकाल दिला.

या निकालाबाबतचे आदेश महापालिकेला आज प्राप्त झाले. 18 व्यापारी संकुलातील 2175 गाळे ताब्यात घेण्याची प्रक्रिया 15 दिवसात सुरु करुन ती दोन महिन्यात पूर्ण करावी.

महापालिकेचे हित लक्षात घेवून शासनाकडे प्रलंबित प्रस्तावांवर दोन महिन्यात निर्णय द्यावा, असेही आदेशात म्हटले आहे.

कराराची मुदत संपलेले 18 व्यापारी संकुल
मनपाच्या 28 पैकी 18 व्यापारी संकुलातील गाळ्यांची मुदत सन 2012 मध्ये संपुष्टात आली आहे. यात महात्मा फुले व्यापारी संकुल, सेंट्रल फुले व्यापारी संकुल, रामलाल चौबे व्यापारी संकुल, भोईटे व्यापारी संकुल, जुने बी.जे. व्यापारी संकुल, डॉ.बाबासाहेब आंबेडकर व्यापारी संकुल, वालेच्या व्यापारी संकुल, छत्रपती शाहू महाराज व्यापारी संकुल, शिवाजीनगर दवाखानेजवळील दुकाने, महात्मा गांधी व्यापारी संकुल, भास्कर मार्केट व्यापारी संकुल, रेल्वे स्टेशन चौकजवळील व्यापारी संकुल, नानीबाई अग्रवाल व्यापारी संकुल, डॉ.शामाप्रसाद मुखर्जी उद्यानालगत व्यापारी संकुल, जुने शाहू महाराज व्यापारी संकुल, धर्म शाळा व्यापारी संकुलांचा समावेश आहे.

 

LEAVE A REPLY

*