विद्यार्थ्यांसह पालक, शिक्षक, भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन

0
जळगाव । दि.20 । प्रतिनिधी-उत्कर्ष मतीमंद विद्यालयाला भोईटे शाळेची इमारत देण्याच्या मागणीसाठी शाळेतील मतीमंद विद्यार्थ्यांसह पालक, शिक्षक आणि भाजपच्या नगरसेवकांनी मनपा इमारतीच्या प्रवेशद्वारावर बसून ठिय्या आंदोलन केले.
दरम्यान, प्रत्येक नगरसेवकांना गुलाब पुष्प देवून ‘आम्हाला इमारत देता का इमारत’ अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली.
इन्स्टिट्यूट फॉर रुरल डेव्हलपमेंट अ‍ॅण्ड सोशल सर्व्हिसेस जळगाव संचलित उत्कर्ष मतीमंद विद्यालय 1989 पासून खोटेनगरात सुरु आहे. या शाळेत 99 विद्यार्थी प्रवेशित आहेत.
सद्या शाळा एकाबाजूला असल्यामुळे मतीमंद विद्यार्थ्यांच्या दृष्टीकोनातून मध्यवर्ती ठिकाणी शाळा असणे आवश्यक आहे.

त्या अनुषंगाने मनपाकडे इमारत मिळावी, अशी वारंवार मागणी करण्यात येत आहे. सुरुवातीला मनपा शाळा क्र.3, 40 ची इमारत देण्याबाबत मागणी केली होती.

मात्र मनपा प्रशासनाने ही मागणी फेटाळली. आता पुन्हा भोईटे शाळेची इमारत द्यावी, अशी मागणी केली आहे. महापौर नितीन लढ्ढा यांनी शाळेला इमारत देण्याबाबत आश्वासन दिले होते.

मात्र आता महासभेत इमारत देण्याबाबत ठराव मंजूर करण्यास चालढकल करीत आहेत. मतीमंद विद्यार्थ्यांच्या विचार करुन भोईटे शाळेची इमारत मिळावी, या मागणीसाठी सकाळी 10 वाजेपासून मतीमंद विद्यार्थ्यांसह शिक्षक आणि पालकांनी मनपाच्या प्रवेशाद्वारावर बसून ठिय्या आंदोलन केले.

तसेच मतीमंद विद्यार्थ्यांनी महासभेसाठी येणार्‍या प्रत्येक नगरसेवकांना गुलाबपुष्प देवून आम्हाला भोईटे शाळेची इमारत द्यावी, अशी मागणी केली.

दरम्यान, महापौर, उपमहापौर यांनी शिक्षकांसह पालकांना पर्यायी जागा देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर महासभेतून भाजप नगरसेवकांनी सभात्याग केल्यानंतर पुन्हा घोषणाबाजी करत ठिय्या आंदोलन करण्यात आले.

 

LEAVE A REPLY

*