मनपाची आज महासभा

0
जळगाव । दि.19 । प्रतिनिधी-पिंप्राळा, मेहरुण येथील घरकुल योजना ही प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत समाविष्ट करण्याच्या प्रस्तावावर निर्णय घेण्यासाठी मनपाची महासभा उद्या दि.20 रोजी सकाळी 11 वाजता महापौर नितीन लढ्ढा यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. महासभेत 16 विषयांवर चर्चा केली जाणार आहे.
तत्कालीन जळगाव नगरपालिकेने शहरात घरकुल योजना राबविली. 11 हजार 424 घरकुलांपैकी 1550 घरकुलांचे काम पूर्ण होवून वितरीत करण्यात आले आहे.
उर्वरित 9874 अपूर्ण अवस्थेत असलेले घरकुल प्रधानमंत्री आवास योजनेत समाविष्ट करण्याच्या प्रस्तावावर निर्णय घेण्यात येणार आहे.

14 व्या वित्त आयोगातून 2 कोटी 26 लाख 68 हजार रुपये स्वच्छ भारत अभियानाच्या खात्यावर वर्ग करण्याबाबत निर्णय घेणे, अग्निशमन व आणिबाणी सेवेसाठी टाटा 1613 वाहन घेवून त्यावर फायर फायटर यंत्रणा बसविण्याच्या 46 लाख 6 हजार 520 रुपयांच्या खर्चाला मान्यता देणे, बालवाड्यांमधील शिक्षिका व मदतनीस यांच्या मानधनाच्या खर्चाला मान्यता देणे, जळगावात उपजिविका केंद्रासाठी जागा उपलब्ध करुन देण्याबाबत निर्णय घेणे, रोंजदारी कर्मचार्‍यांना समान वेतन देण्याबाबत निर्णय घेणे, महापालिकेची 48 क्रमांकाची शाळा विवेकानंद प्रतिष्ठान यांना देण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.

मनपात सीसीटीव्ही लावण्याचा प्रस्ताव
सतरा मजली इमारतीमध्ये सर्व मजल्यांवर सीसीटीव्ही कार्यान्वीत करण्याचा प्रस्ताव आहे. यासह लीफ्टच्या देखभाल दुरुस्तीचे धोरण ठरविणे, मनपाची अपूर्ण घरकुले पंतप्रधान आवास योजनेतंर्गत समाविष्ठ करण्याच्या प्रशासनाच्या प्रस्तावावर निर्णय घेण्यासह 16 विषयांवर चर्चा केली जाणार आहे.

नामकरणाचा विषय गाजण्याची शक्यता
एम. जे. कॉलेज ते भास्कर मार्केट या रस्तावरील बहीणाबाई उद्यानाच्या जवळील रिंगरोडच्या चौकाला कवयत्रि बहीणाबाई चौक असल्याने तेथे तसा फलक लावण्यासाठी महापालिकेने कार्यवाही करावी असा प्रस्ताव नगरसेविका सीमा भोळे, दिपमाला काळे यांनी दिला आहे. त्यावर देखील चर्चा केली जाणार असून हा विषय महासभेत गाजण्याची शक्यता आहे.

 

LEAVE A REPLY

*