गाळ्यांबाबतची सुनावणी बेकायदेशीर

0
जळगाव । दि.1 । प्रतिनिधी-मनपा मालकीच्या मुदत संपलेल्या 18 व्यापारी संकुलातील गाळे दोन महिन्याच्या आत ताब्यात घेण्याबाबत औरंगाबाद खंडपीठाने निर्देश दिले आहे.
या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनाने उर्वरित गाळेधारकांची सुनावणीची प्रक्रिया सुरु केली आहे. दरम्यान, फुले मार्केटच्या जागेबाबत अद्यापपर्यंत निर्णय न झाल्यामुळे कारवाई करणे योग्य नाही. तसेच सुनावणी देखील बेकायदेशिर असल्याचा युक्तीवाद गाळेधारकांसह त्यांच्या वकीलांनी केला.

मनपा मालकीच्या 28 व्यापारी संकुलांपैकी 18 व्यापारी संकुलातील 2175 गाळ्यांची मुदत एप्रिल 2012 रोजी संपुष्टात आली. गाळे ताब्यात घेण्यासाठी 81 ब ची नोटीस देवून सुनावणी घेण्यात आली होती. 2175 पैकी 665 गाळेधारकांची सुनावणी होवून अंतिम आदेश देण्यात आले होते. उर्वरित 1520 गाळेधारकांची सुनावणी झाली नव्हती.

दरम्यान, औरंगाबाद खंडपीठाने 15 दिवसात प्रक्रिया सुरु करुन दोन महिन्यात गाळे ताब्यात घ्यावे, असे निर्देश दिले. खंडपीठाचे निर्णयानुसार प्रक्रिया करण्यासाठी उर्वरित 1520 गाळेधारकांची सुनावणी घेण्यात येत आहे.

दरम्यान, आज सेंट्रल फुले मार्केट, शास्त्री टॉवरमधील 418 गाळेधारकांची सुनावणी पूर्ण झाली. उपायुक्तांना सुनावणी घेण्याचा अधिकार नाही. 81 ब ची नोटीस या आदी दिली होती. आता पुन्हा नोटीस देवून घेत असलेली सुनावणी बेकायदेशिर आहे. यापूर्वी प्रिमीयम दिले आहे.

आता प्रिमीयम मागणे योग्य नाही. तसेच फुले मार्केट, सेंट्रल फुले मार्केटसह चार मार्केटची जागा शासनाची आहे. त्यावर शासनाने अद्यापपर्यंत निर्णय दिलेला नाही. त्यामुळे कारवाई करणे योग्य नाही. अशी बाजू गाळेधारकांसह त्यांच्या वकीलांनी सुनावणीअंती युक्तीवाद करतांना मांडली.

याप्रकरणी येत्या दोन-तीन दिवसात निकाल देण्यात येणार आहे. दुपारी जुने शाहू महाराज मार्केटमधील 118 गाळेधारकांची सुनावणी होती.

मात्र त्यांनी मुदत मागितली. त्यामुळे दि.4 रोजी सुनावणी होणार आहे. तर उद्या दि.2 रोजी गेंदालालमिल मार्केट, लाठी शाळा मार्केट, शिवाजीनगर दवाखानाजवळील मार्केटमधील 135 गाळेधारकांची सुनावणी होणार आहे.

LEAVE A REPLY

*