कर्जमाफीचा निर्णय योग्यवेळी – आ.खडसे

0
जळगाव । दि.24 । प्रतिनिधी-गेल्या दोन वर्षांपासून शेती आणि शेतकर्‍यांची अवस्था बिकट आहे. शेतकरी शेतात खुप कष्ट घेतो.
मात्र, निसर्गाच्या अनियमित चक्रामुळे आणि कधीकधी व्यवस्थेतील त्रृटींमुळे राज्यातील शेतकरी अडचणीत आहे.
अशावेळी शेतकर्‍याला केवळ कर्जमाफी न देता त्याला कर्जमुक्तीकडे नेण्याचा ऐतिहासिक निर्णय महाराष्ट्र सरकार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे.
सध्या पावसाने ताण दिलेली असून दुबार पेरणीचे संकट डोक्यावर आहे. अशा वेळी राज्यातील 89 लाख शेतकर्‍यांना दिलासा देणारा आणि 90 टक्के शेतकर्‍यांचे सातबारा कोरा करणारा कर्जमाफीचा निर्णय हा देशातील सर्वांत धाडसी निर्णय आहे, अशी प्रतिक्रिया माजी कृषिमंत्री आ.एकनाथराव खडसे यांनी व्यक्त केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर कर्जमाफीसाठी छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजना जाहिर केल्यानंतर आ. खडसे यांनी आपले सविस्तर मत मांडले.

खडसे म्हणाले, शेतकर्‍यांना कर्जमुक्त करण्याचा सरकारचा अजेंडा आहे. कर्जमाफी आणि कर्जमुक्तीत मोठा फरक आहे. कर्जमाफी ही शेतकर्‍यांमधील केवळ विशिष्ट घटकांना किंवा आर्थिक मर्यादा निश्चित करुन देता येते.

परंतु कर्जमुक्तीसाठी सर्वच शेतकरी घटकांचा विचार करावा लागतो. हा मुद्दा मी कृषिमंत्री असताना स्पष्ट केला होता. त्याचप्रमाणे यावेळी राज्य सरकारने सधन शेतकर्‍यांचा आणि नियमित कर्ज भरणार्‍या शेतकर्‍यांचाही विचार करुन कर्जमाफीचा निर्णय घेतला आहे.

सरसकट दीड लाख रुपयांचे कर्ज माफ होणार आहे. याचा लाभ जवळपास 90 टक्के शेतकर्‍यांना मिळेल. राज्य सरकारवर सुमारे 34 हजार कोटींचा हा बोजा पडणार आहे.

विरोधक मंडळी शेतकर्‍यांचा सातबारा कोरा करा अशी मागणी करीत होते. आता या निर्णयामुळे 40 लाख शेतकर्‍यांचा सातबारा कोरा होईल.

त्यामुळे ही कर्जमाफी देशातली सर्वांत मोठी व सर्वच शेतकर्‍यांना लाभ देणारी आहे. या कर्जमाफीत राज्य सरकारने नियमित कर्ज भरणार्‍या शेतकर्‍यांनाही लाभ द्यायचे ठरविले आहे.

हा निर्णय म्हणूनच महत्त्वाचा आहे. जे शेतकरी नियमित कर्ज भरत आहेत त्यांच्या बँक खात्यात 25 टक्के प्रोत्साहनपर अनुदान जमा होणार आहे.

राज्य सरकारने ही समान न्यायाची व्यवस्था करताना योजनेला दिलेले छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजना हे नाव मला समर्पक वाटते असेही आ. खडसे म्हणाले.

ही कर्जमाफी जाहिर करताना राज्य सरकारने घटक पक्षांच्या प्रमुखांसह विरोधी पक्षांचे नेते व शेतकरी प्रतिनिधींशी चर्चा केली.

हा पायंडा सुद्धा या निर्णयाची व्यापकता दर्शवतो असे स्पष्ट करुन आ. खडसे म्हणाले, काँग्रेसच्या काळात कर्जमाफीची अंमलबजावणी करताना काही दोष राहिले होते.

ते दूर करण्याचाही सरकार प्रयत्न करणार आहे ही लक्षवेधी बाब आहे. राज्य सरकार बँकांशी संपर्क साधून हप्ते पाडून त्याची परतफेड करणार आहे.

म्हणजेच केवळ शेतकर्‍याच्या कर्जमुक्तीचा विचार हे राज्य सरकार करीत नाही तर बँका आणि स्वतः सरकारही कर्जमुक्त होण्याचा प्रयत्न करणार आहे.

 

LEAVE A REPLY

*