बेकायदेशीर कामांना विरोध करणारच !

0
धरणगाव, । प्रतिनिधी-पालिकेच्या चार कोटी खर्चाच्या जलशुध्दीकरण केंद्राचे काम कायदेशीर करावे, यातील अडचणी तपासून कामाचे आदेश देण्याचा अधिकार मुख्याधिकारी, तत्कालीन नगराध्यक्षांना देण्याचा विषय आपणच सभागृहात आणला होता.
यानंतर तो सर्वानूमते मंजूर करण्यात आला होता. जलशुध्दीकरण केंद्राला कुणाचाच विरोध नव्हता. मात्र, हा ठराव झाल्यानंतर तात्काळ मुख्याधिकार्‍यांनी संबंधित ठेकेदारांना काम थांबविण्याचे आदेश दिले होते.
यानंतर वर्षभर काम बंद होते. सहकार राज्यमंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी या कामातील अडचणी दुर केल्यानंतर शिवसेनेने गावात जल्लोष केला.
या जल्लोषातच आपल्याला खलनायक ठरविण्याचा प्रयत्न झाला. शिवसेनेकडून धरणगावकरांची दिशाभूल केली जात असल्याचा दावा राष्ट्रवादीचे माजी उपनगराध्यक्ष दिपक वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत केला.

अंदाजीत चार कोटी रूपये खर्चाच्या जलशुध्दीकरणाचे काम ज्या 12 एकर पैकी एक हेक्टर जागेवर प्रस्तावित करण्यात आले होते. त्या 12 एकर जागेवर उद्यानासाठीचे आरक्षण होते.

हे आरक्षण उठविण्याबाबतचा ठराव करून तो जळगाव नगररचनाविभागाकडून मंजूर करून पुणे कार्यालयात पाठविण्यात आला होते.

पुणे येथील संबंधीत कार्यालयातून आरक्षण उठविण्याबाबत काही त्रुटी 2001 मध्येच काढण्यात आल्या होत्या. याबाबतचा पाठपुरावा पालिकेकडून नंतर करण्यात आला नाही.

जलशुध्दीकरण केंद्रासाठी निधी मिळाल्यानंतर निवडणूकीवर डोळा ठेवून श्रेय लाटण्याच्या प्रयत्नात जागेवरील उद्यानाचे आरक्षण कायम असतांनाच निविदा प्रक्रिया राबवून संबंधीत ठेकेदाराला कार्यादेश देण्यात आले.

उद्यानासाठी आरक्षीत जागेवर हा प्रकल्प झाला असता तर चार कोटीचे हे काम बेकायदेशीर ठरले असते. मात्र, याबाबत सर्वांना अंधारात ठेवले जात होते.

पालिका सभागृहात जेव्हा कायदेशीर बाबी तपासण्याची जबाबदारी मुख्याधिकारी आणि नगराध्यक्षांना देण्यात आली तेव्हा परिस्थितीचे गांभिर्य ओळखून मुख्याधिकार्‍यांनी तडकाफडकी काम बंद करण्याचे आदेश दिले.

आता वर्षभरानंतर या जागेवरील आरक्षण उठविल्यानंतर शिवसेना जल्लोष करून स्वत: हिरो आणि मला खलनायक बनविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा दावा दिपक वाघमारे यांनी केला.

जलशुध्दीकरण केंद्राबाबत ना.गुलाबराव पाटील धरणगावकरांची दिशाभूल करीत असून वारंवार दिलेल्या आश्वासनांची पुर्तता होत नसल्याने माझ्या डोक्यावर खापर फोडण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिपक वाघमारे यांनी म्हटले आहे.

माझ्या हरकतीमुळे जलशुध्दीकरण केंद्राचे काम थांबले हा आरोप होत असले तर मी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पेक्षा मोठा आहे काय? माझी हरकत चूकीची होती तर एक वर्षभर काम सुरू का केले नाही? ना.पाटील यांनी कामातील अडथळा दुर केला म्हणजे नेमके काय केले? मुख्याधिकार्‍यांनी तात्काळ काम बंदचे आदेश का दिले? मुख्याधिकारी ना.पाटील यांचे न ऐकता माझेच ऐकतात असे शिवसेनेला म्हणायचे आहे काय? उद्यानासाठी आरक्षीत जागेवर जलशुध्दीकरण केंद्र उभारणे कायदेशीर होते काय? कुणी हरकत घेतली असती तर जलशुध्दीकरण केंद्र बंद पडले नसते काय? असे प्रश्न दिपक वाघमारे यांनी पालिकेतील सत्ताधार्‍यांना या पत्रकार परिषदेतून विचारले.

जलशुध्दीकरण केंद्राचे काम बेकायदेशीर होत होते आणि मुख्यमंत्री व प्रशासनाला अंधारात ठेवून कामाची निविदा प्रक्रिया राबविण्यात आली.

कामाचे आदेश आताच देण्यात आल्याचे शिवसेनेने गावात फटाके फोडून सिध्द केल्याचे दिपक वाघमारे यांनी म्हटले.

जलशुध्दीकरण केंद्राची मागणी गेल्या चार दशकांपासूनची आहे. मात्र, श्रेय लाटण्याच्या प्रयत्नात घाईघाईत कायदे धाब्यावर बसवून काम करण्याचा प्रयत्न होत होता.

म्हणूनच ‘कायदेशीर’ काम करण्याचा आग्रह मी धरला. हा आग्रह चूकीचे असेल तर अशी चुक मी हजार वेळा करेन असे दिपक वाघमारे यांनी ठणकावून सांगितले.

पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी ग्रंथालय सेलचे जिल्हाध्यक्ष मोहन पाटील, डॉ.मिलिंद डहाळे, माजी नगरसेवक निलेश चौधरी व राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

*