चाळीसगाव येेथे तरुणावर चाकूहल्ला

0

चाळीसगाव । दि.3 । प्रतिनिधी-शहरातील भरचौकात सिग्नल पाँईट येथे मेहुणबारे येथील 22 वर्षीय तरुणावर अज्ञात चार ते पाच तरुणानी चाकुहल्ला करुन, त्याच्यावर चाकूने सपासप वार केलेत.

तरुणाने चाकू हाताने अडविल्यामुळे पुढील अनर्थ टळला. सध्या तो शहरातील खासगी दवाखान्यात उपचार घेत आहे. ही घटना गुरुवारी दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास घडली असून रात्री उशिरापर्यंत पोलीस स्टेशनला कुठल्याही प्रकारची नोंद नव्हती.

राहुल मोहन जाधव (वय 22, रा.मेहुणबारे) याचे मेहुणबारे येथे इलेक्ट्रॉनिकचे छोटेसे दुकान आहे. तो नेहमी चाळीसगाव येथे दुकानाचा माल घेण्यासाठी येत असतो.

गुरुवार दि.3 रोजी नेहमीप्रमाणे तो माल घेण्यासाठी मेहुणबारे येथून चाळीसगाव येथे पॅजोरिक्षाने आला. शहरातील भरचौकात असलेल्या सिग्नल पाँईटजवळील गिरणार स्विटजवळ चालत असताना, आधिपासून दबा धरुन बसलेल्या तरुणानी त्याच्यावर चाकुहल्ला केला.

त्याला काही कळण्याच्या आतच त्यांच्या पाठीवर, पोटावर, कबरेखाली अज्ञात तरुणांनी सपासप वार केलेत, तसेच त्याच्या पोटात चाकू भोकसण्याचा प्रयत्न करत असताना राहुलने तो हाताने अडविल्याने पुढील अनर्थ टळला.

राहुल याच्यावर अचानक चाकूचे वार झाल्याने तो घाबरला आणि आरडाओरड करु लागला. आरडाओरड केल्यामुळे हल्लेखोरांनी तेथून पळ काढला, तसेच राहुल याला नागरिकांनी तत्काळ शहरातील खासगी दावाखान्यात नेले.

वेळेवर उपचार मिळाल्यामुळे राहुलची प्रकृती धोक्याच्या बाहेर आहे. मिळालेल्या माहितीनुसार राहुल याच्यावर हल्ला करणारे सर्व तरुण हे दारु प्यायलेले होते.

राहुल हा अतिशय शांत स्वभावाचा असल्याची मेहुणबारे येथील ग्रामस्थांकडून माहिती मिळाली आहे. तसेच त्याचा कोणाशीही वाद नसल्याने त्याच्या परिवारातील सदस्यांचे म्हणणे आहे.

भरचौकात आणि भरदुपारी एका तरुणावर चाकुहल्ला झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे. चाकुहल्ला झाल्याने शहरात पोलिसांचा वचक नसल्याचे बोलेले जात आहे.

सिग्नल पाँईट येथील लावलेल्या सीसीटीव्ही कॉमेर्‍यावरुन हल्लेखोरांना शोधून काढण्याचे पोलिसांपुढे आव्हान आहे. तसेच ज्याठिकाणी हल्ला झाला त्या ठिकाणचे राखी दुकानदार पोलिसांना भीतीपोटी कुठल्याही प्रकारची माहिती देत नसल्याचे समजते.

 

LEAVE A REPLY

*