भादली बु.येथे कर्जबाजारी शेतकर्‍याची आत्महत्या

0
नशिराबाद, ता.जळगाव । दि.22 । वार्ताहर-येथून जवळच असलेल्या भादली बु. येथील महेश सूर्यकांत चौधरी (वय 40) या शेतकर्‍याने सोसायटी तसेच खाजगी कर्जाला कंटाळून विष प्राशन करून आपली जीवन यात्रा संपविल्याची दुर्दैवी घटना दि.22 जून रोजी सकाळी 5.30 वाजेच्या सुमारास घडली.
मयत महेश चौधरी याचेवर विविध कार्यकारी सोसायटी भादली बु. चे व इतर खासगी असे दोन-तीन लाख रू. कर्ज असल्याचे समजते.
या शेतकर्‍याने कर्जाचा डोंगर असताना मृग हंगामासाठी कर्ज, उसनवारी करून बि-बियाणे खरेदी केले व शेतात पेरणी केली. मात्र पावसाने गेल्या आठवडा भरापासून दडी मारल्याने दुबार पेरणीचे संकट निर्माण झाल्याच्या भितीने व कर्ज माफ न झाल्याने चौधरी यांची मनस्थिती दोन-तीन दिवसांपासून ढासळलेली होती.
शेवटी महेश सूर्यकांत चौधरी या शेतकर्‍याने त्याच्या राहत्या घरातच काहीतरी विषारी औषध घेवून जिवन यात्रा संपवली. त्याच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, आई, भाऊ, वहीनी असा परिवार आहे.

याप्रकरणी नशिराबाद पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आली असून पोलीस तपास करीत आहेत.

शासनाने कर्जमाफीची घोषणा केली मात्र त्यासाठी अनेक नियम व अटी लादल्याने कर्जमाफी पासून असंख्य शेतकरी वंचीत राहत आहेत.

कर्जमाफ झाल्याचे वृत्त माहित होताच अनेक शेतकर्‍यांना त्याचा आनंद झाला होता. मात्र त्या सवलतीत आपण बसत नाही हे समजताच अनेक शेतकर्‍यांचा हिरमोड झाला आहे.

शासनाने कोणतीही अट न ठेवता सर्व शेतकर्‍यांचे सातबारा उतारे कोरे करावेत व आत्महत्येची शृंखला थांबवावी. भादली येथील हृदयद्रावक घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.

आता तरी सरकारला जाग येईल की नाही? असा प्रश्न सर्वसामान्य शेतकर्‍यांना पडला आहे.

 

LEAVE A REPLY

*