‘खेळ’ मांडला….!

0

आज व्हिडीओ गेम्स, सोशल मीडिया, सर्फिंग, चॅटिंग, साईट व्हिजीट अशा इंटरनेट अ‍ॅक्टिव्हिटीत किशोरवयीन मुले अडकत चालली आहेत.

त्यातून मुलांना बाहेर काढण्यासाठी वा परावृत्त करण्यासाठी आपल्या शक्तीचा, बुद्धीचा वापर कसा करायचा हे ठरवावे लागेल. यात पालक बरेच काही करू शकतात.

व्हॉटस्अ‍ॅप, फेसबुकसारख्या समाज माध्यमांनी भावनिकतेला व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. तर दुसरीकडे मोबाईलवरील गेम्सनी मुलांच्या भावविश्वाला ग्रासले आहे.

मनप्रीत सिंगने ब्ल्यू व्हेल या गेममुळे आत्महत्या केल्याची पोलिसांची माहिती आहे. मुळातच हा गेम वादग्रस्त आणि जीवघेणा असल्याची टीका यापूर्वीही झाली आहे.

रशियामध्ये यामुळे 100 हून अधिक जणांचे तर जगभरातील इतर देशांत 250 जणांनी या गेममुळे जीव गमावल्याच्या नोंदी आहेत.

या खेळामध्ये अजब प्रकारची 50 आव्हाने दिली जातात. उदाहरणार्थ स्वतःला जखमी करून घेणे, भयपट पाहणे इत्यादी. ते आव्हान पूर्ण झाल्यानंतर त्याचा पुरावा द्यावा लागतो.

लेखक – डॉ. राजेंद्र बर्वे, ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ

या खेळातील शेवटचा टप्पा आत्महत्या करणे हा असतो. मनप्रीतनेही अशाच प्रकारे शेवटचा टप्पा गाठल्याचे सकृतदर्शनी आढळले आहे. मनप्रीतच्या मृत्यूनंतर यावर बंदी घालण्याचा विचार पुढे आला आहे.

मात्र या गेमबाबत काही ठिकाणी असेही म्हटले गेले आहे की हा गेम एकदा डाऊनलोड केल्यानंतर तो डिलिट अथवा अनइनस्टॉल करता येत नाही.

त्यामुळे तांत्रिक बाबी विचारात घेऊन याबाबतचा निर्णय व्हायला हवा. अनेक जण सरकट ऑनलाईन गेम्सवर बंदीची मागणीही करताना दिसतात.

मात्र तसे करता येणे शक्य नसते. कारण तसे करायला गेल्यास व्यक्तिस्वातंत्र्याचा मुद्दा पुढे आणला जाऊ शकतो. त्यामुळे सरसकट निर्णय घेता येणार नाही.

आपण एखादा गेम खेळतो तेव्हा शरीराबरोबरच आपला मेंदूही तो गेम खेळत असतो. मेंदूला गुंतवून ठेवू शकेल अशा प्रकारची त्या गेमची रचना असते.

त्या गेममध्ये तुमचे मन एकाग्र होते, तुम्हाला दिसते, ऐकू येते, हालचाली पाहता येतात. यामुळे आपला मेंदू अधिक उत्तेजित होत असतो.

गेम खेळण्यासाठी ज्या भागाचा अधिक वापर होतो तेथे अधिक उत्तेजना दिसून येते. मेंदूचा अधिकाधिक भाग अशा गेममध्ये गुंतू लागला की परावलंबित्व वाढते.

वास्तव आणि आभासी अशा एकाच वेळी दोन पातळ्यांवर मेंदू काम करत असतो. अशा प्रकारे मेंदूला अधिक उत्तेजित करणारे गेम जर खेळायला मिळाले नाहीत तर उदास वाटू लागते, चिडचिड होते, राग येतो. अशा प्रकारची लक्षणे लक्षात येतात.

दुसरी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी ती म्हणजे ब्ल्यू व्हेल किंवा तत्सम गेम्ससाठी वेगवान इंटरनेटची आवश्यकता असते. साहजिकच सधन, सुखवस्तू घरातील मुले या गेम्सचा वापर करताना दिसतात. विरंगुळ्याच्या सामान्य साधनांचा वापर त्यांच्यासाठी कंटाळवाणा ठरलेला असतो.

त्यामुळे काही तरी किंवा थ्रिलिंग, वेगळे करण्याची इच्छा आणि ओढ असते. त्यातून ते या गेम्सकडे वळतात. अशा प्रकारचे गेम्स तयार करतानाच अत्यंत खुबीने आणि चलाखीने तयार केलेले असतात.

त्यामुळे युजर्स किंवा प्लेअर्स त्याच्या जाळ्यात कधी ओढले जातात हे त्यांनाही कळत नाही. गेम खेळत असताना विचारशक्ती कमकुवत होते. त्यामुळे त्यातून सहजासहजी बाहेर पडता येत नाही.

डायग्नोस्टिक स्टॅटॅटिक्स मॅन्युअल (डीएसएम) मध्ये सर्व डिसऑर्डर्सची माहिती दिलेली असते आणि त्यांना क्रमांक दिलेले असतात.

इंटरनेट अ‍ॅडिक्शन आणि गेम्स अ‍ॅडिक्शन हा लवकरच त्यामध्ये मानसिक रोग म्हणून समाविष्ट होण्याची शक्यता आहे. यावरून याविषयीचे गांभीर्य लक्षात घेतले पाहिजे.

अन्य वयोगटातील व्यक्तीही गेम्स आणि इंटरनेटच्या आहारी गेलेल्या पाहायला मिळतात. मात्र मुलांसंदर्भात याचा धोका अधिक असतो.

कारण त्यांचे वय जडणघडणीचे असते. त्यांच्यात परिपक्वता नसते. त्यामुळे मुलांच्या हाती मोबाईल देताना, त्यांना इंटरनेटशी जोडताना पालकांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे.

नियमितपणाने लक्ष ठेवणे हा यावरचा उपाय आहे. अलीकडील काळात पालक रोजच्या कामांमध्ये इतके गढून गेलेले असतात की त्यांना मुलांकडे लक्ष द्यायला वेळ नसतो.

त्यांचे भावविश्व समजून घेण्यासाठी आवश्यक असणारा सुसंवाद या नात्यांमधून हरपत चालला आहे. साहजिकच आपले कुतूहल शमवण्यासाठी, विरंगुळ्यासाठी मुले या माध्यमांकडे वळतात.

कित्येकदा पालकही मुले मोबाईल खेळताहेत ना, आपल्याला त्रास देत नाहीयेत ना असा विचार करून त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात.

पण कालांतराने मुले त्या जाळ्यात अडकत जातात तेव्हा पालक जागे होतात. दुसरी गोष्ट म्हणजे अशावेळीही मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला घेतला जात नाही.

याचे कारण आपल्याकडे मानसोपचारतज्ज्ञांचे मार्गदर्शन घेण्याविषयी गैरसमज आहेत. कित्येकदा पालक
मुलांमधील इंटरनेट व्यसनाधिनता लक्षात आल्यानंतर धाकदपटशा, मारहाण करतात.

पण त्यामुळे समस्या सुटण्याऐवजी अधिक बिकट बनण्याची शक्यता असते. त्यामुळे मोबाईल वापरणार्‍या मुलांच्या वागण्यातील बदल, अभ्यासाकडे दुर्लक्ष, आक्रमकता या छोट्या छोट्या गोष्टींकडे पालकांनी अत्यंत काळजीपूर्वक लक्ष देणे आवश्यक असते.

सध्याच्या परिस्थितीला बर्‍याच अंशी मुलेही जबाबदार आहेत. आजच्या पिढीला तात्काळ तृप्ती हवी असते. एक झुरका ओढल्यानंतर वेगळे जग अनुभवता आले पाहिजे, अशी मानसिकता बळावत चालली आहे.

त्यासाठीच अशा गेम्सचा आधार घेतला जातो. मात्र तंत्रज्ञान माणसाला इतरांपासून एकटे पाडत असते. तरीही आपल्याकडे मुलांना आजच्या काळात तंत्रसुलभता उपलब्ध करून दिली जात आहे.

दुसरीकडे भौतिक गोष्टींची मुबलकताही आहे. त्यातूनच मुलांमध्ये उद्धटपणा वाढत आहे. स्वातंत्र्य आहे पण जबाबदारीचे भान नाहीये. एक प्रकारचे पीअर प्रेशरही आहे.

आजूबाजूची मुले जर गेम खेळत असतील तर मग मी का मागे राहू, अशी स्पर्धात्मक मानसिकताही मुलांमध्ये वाढीस लागलेली आहे. त्यामुळे हा प्रश्न गंभीर आणि गुंतागुंतीचा आहे. त्याविरुद्ध लोकचळवळ उभी राहिली पाहिजे.

मुलांना इंटरनेटच्या वेडापासून दूर नेण्यासाठी छंदांची त्याचबरोबर तितक्याच एक्सायटिंग गोष्टींशी परिचय करून दिला पाहिजे. वेळप्रसंगी पालकांनी स्वतः त्यात सहभागी होऊन मुलांना त्यातील आनंद समजावून सांगितला पाहिजे.

यासाठी मैदानी खेळ खूप उपयोगी ठरू शकतात. तिथे खर्‍या अर्थाने साहस व कर्तृत्व गाजवण्याची संधी असते. खर्‍या अर्थाने कस लागतो.

गेम्सच्या लेव्हल पार करत जाण्यामध्ये कसलेही साहस नसते. पण मुलांवर त्यांचे गारूड इतके प्रचंड असते की त्यांना हे पटत नाही. म्हणूनच पालकांनी सजग राहण्याची गरज असते.

मध्यंतरी मायक्रोसॉफ्टचे सर्वेसर्वा आणि जगातील श्रीमंत व्यक्ती बिल गेटस् यांनी माझ्या
मुलाला 14 वर्षे पूर्ण झाल्यानंतर हातामध्ये मोबाईल दिल्याचे सांंगितले होते.

आपल्याकडे आज किती पालक हे पाळतात? अलीकडील काळात तर अभ्यासक्रम, गृहपाठ, क्लासेसच्या बदललेल्या वेळा आदींबाबतची माहितीही थेट व्हॉटस्अ‍ॅप किंवा इतर माध्यमातून मुलांना दिली जाते.

एका दृष्टीने हे चांगले असले तरीही त्यावर पालकांचे बारकाईने लक्ष असणे आवश्यक आहे. तरच असे ‘बळी’ रोखता येतील.

कोणताही गेम खेळणे ही विकृती नाही. कोणतेही तंत्रज्ञान वाईट नसते. ते आपण कशाप्रकारे वापरतो यावर सर्व काही अलंबून असते.

अणुशक्ती आपण विध्वंसक शस्त्र म्हणूनही वापरू शकतो आणि अणुशक्तीपासून विद्युतनिर्मितीही करू शकतो. आपण तंत्रज्ञानाचा फक्त बाजारू उपयोग केला तर अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते.

 

 

LEAVE A REPLY

*