बदलाचे कवडसे !

0
शासकीय सेवकांचा कार्यालयीन वेळ मोबाईलवर गप्पा मारण्यात खर्च होत असल्याने जनतेच्या कामाचा खोळंबा होतो, असे निरीक्षण देशाच्या न्यायसंस्थेने म्हणजे घटनानिर्मित सर्वोच्च संस्थेने नोंदवले आहे.
शासकीय सेवकांच्या सेवाभावाबद्दल जनतेचे मत कमालीचे प्रतिकूल असते; पण असे निराशाजनक वर्तमान आशावादी बनवण्याचा प्रयत्न ठिकठिकाणी सुरू आहे. अशा काही घटना अलीकडे घडत आहेत.
ऑलिम्पिक पदक विजेते खेळाडू राज्यवर्धनसिंह राठोड यांनी क्रीडा आणि युवक कल्याण खात्याचा स्वतंत्र पदभार नुकताच स्वीकारला.

त्वरित त्यांनी स्पोर्ट अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया (साई) या सरकारी क्रीडा संस्थेच्या कार्यालयाला भेट दिली. या मंत्रालयात मंत्री म्हणून येण्याआधी नोकरशाहीचा अजब कारभार खेळाडू म्हणून मी अनुभवला आहे.

एकएका कागदावर संबंधिताची स्वाक्षरी मिळवण्यासाठी किती हेलपाटे मारावे लागतात व किती वाट बघावी लागते हे पाहिले आहे. प्रशासक म्हणून आपण कुणी आहोत; खेळाडूंना ते वेगळेपण जाणवून देण्याची हवा या खात्यातील अनेक सरकारी अधिकार्‍यांच्या डोक्यात शिरलेली असते.

खेळाडू आणि त्यांना आवश्यक त्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याचे आद्यकर्तव्यच संबंधित विसरून जातात, असे स्वानुभवाचे कटू बोल राठोड यांनी अधिकार्‍यांना ऐकवले.

ही अधिकारशाही संपवा, असे त्यांनी स्पष्ट शब्दांत बजावले. महाविद्यालयात होणार्‍या रॅगिंगने आतापर्यंत अनेक बळी घेतले आहेत. अनेक विद्यार्थी निराशेच्या गर्तेत ढकलले गेले आहेत.

घृणास्पद रॅगिंग थांबवण्यासाठी पिंपरी-चिंचवडमधील काही महाविद्यालयांनी पुढाकार घेतला आहे. ‘महाविद्यालयात प्रवेश मिळाला तर रॅगिंग करणार नाही’ असे प्रतिज्ञापत्र दाखल होणार्‍या विद्यार्थी व त्यांच्या पालकांकडून घेतले जात आहे.

कारणपरत्वे पोलीस ठाण्याची पायरी चढणार्‍या व्यक्तीला सौजन्याचा अनुभव येईल याची खात्री पोलीस प्रशासन तरी कशी देणार? त्यावर उतारा म्हणून पोलीस ठाण्यात आल्यावर कशी वागणूक मिळाली, याचे अनुभव नोंदवणारे निवेदन नागरिकांकडून भरून घेण्याची पद्धत ठाणे पोलीस आयुक्तालयाने सुरू केली आहे.

असे उपक्रम ‘नव्याचे नऊ दिवस’ या म्हणीसारखे ठरणार नाहीत तसेच पोलीस व नागरिकांमधील दुरावा दूर होऊन सौहार्दाचे वातावरण वाढीला लागेल, असा या कल्पनेमागील हेतू सांगण्यात येत आहे.

तो यशस्वी व्हावा, अशीच जनतेचीदेखील अपेक्षा राहील. या अभिनव उपक्रमाबद्दल चिंचवड परिसरातील महाविद्यालये, ठाण्याचे पोलीस आयुक्तालय अभिनंदनास
पात्र आहेत.

 

LEAVE A REPLY

*