घरोघरच्या गौराईंचे प्रश्न

0
काल घरोघरी गौराईंचे सोनपावलांनी आगमन झाले. माहेरवासाला आलेल्या गौराईंचे कोडकौतुक पुरवण्यासाठी सगळ्यांचीच लगबग सुरू आहे. ‘गौराई माझी लाडाची लाडाची गं…’ असे म्हणत त्यांचे स्वागत करताना मनाच्या तळाशी एक खदखद जाणवत आहे.
पाहुण्या गौराईंचा आगमन सोहळा घरोघर रंगत आहे. तथापि जन्माला येणार्‍या गौराईंना मात्र जगण्याचा हक्कच नाकारला जात आहे. गौरी तीन दिवसांच्या पाहुण्या असतात.

त्यांच्या उत्सवी अस्तित्वाची दखल घेत असताना पहिला मान गौरींना दिला जातो. दहा दिवसांच्या पाहुण्याला थोडेसे गृहीतच धरले जाते; पण प्रत्यक्ष आयुष्यात मात्र वंशाच्या दिव्याचाच आग्रह का धरला जातो? गौरी मात्र दिवसेंदिवस अधिकच ‘नकुशी’ होत आहेत.

पुरोगामित्वाचा ढोल पिटणार्‍या महाराष्ट्रातील 14 जिल्ह्यांत मुलींचे प्रमाण राष्ट्रीय सरासरीपेक्षाही कमी आढळले आहे. समाजाच्या उक्ती आणि कृतीतील या फरकाने जाणते अस्वस्थ आहेत.

सणांचे ‘इव्हेन्ट’ होऊ लागल्यापासून त्यातील मर्म हरवत आहे. बीड, उस्मानाबाद, सांगली, कोल्हापूर, जालना, जळगाव, बुलडाणा, वाशिम, औरंगाबाद आणि पुणे हे जिल्हे संवेदनशील मानले गेले आहेत.

समाजात लोकशाहीची मूल्ये रुजत आहेत, असे स्वातंत्र्याच्या सत्तरीत मानले जात आहे. गौरींचे घटते प्रमाण पाहता ते खरे मानावे का? शिक्षणाची दारे सर्वांसाठी उघडली गेल्यानंतर सुधारणांचे वारे वाहू लागेल, मतभेद व लिंगभेदाची दरी कमी होईल, समाज मनातील पुरुषप्रधानता पुसट होत जाईल, असे समाजधुरिणांना वाटत असले तरी वास्तव मात्र निराशाजनकच आहे.

समाजाची बुरसटलेली मानसिकता अजूनही बदललेली नाही हे सत्य मुलींच्या घटत्या संख्येने ठसठशीतपणे समाजासमोर आणले आहे. मुलींच्या घटत्या गुणोत्तराचे दुष्परिणाम समाजावर आता आदळू लागले आहेत.

तरुण पिढी दुष्परिणामांचा बळी ठरत आहे. वंशाच्या दिव्याला विवाहासाठी कन्या मिळणे दुरापास्त होऊ लागले आहे. तरीही बदलाला समाजमन तयार का नसावे? समाजाचे भविष्य कसे असावे याचा विचार घरोघरचे ‘गणपती’ आता नाही तर कधी करणार?

की पुन्हा एकदा देशात महाभारत काळ अवतरावा, अशी अपेक्षा केली जात असेल? त्यादृष्टीने मानसिकता कधी बदलणार? समान दृष्टीने मुला-मुलींचा विचार कधी सुरू होणार?

तसे झाले नाही तर गौरींचे कोडकौतुक फक्त सणापुरतेच मर्यादित राहील आणि घर मात्र खर्‍या गौरीची फक्त वाटच पाहत राहील का? समाजमन बदलले नाही तर दुर्दैैवाने तो काळ फारसा दूर असेल का?

LEAVE A REPLY

*