हे जीवन सुंदर आहे !

0
समाजातील काही सामान्य माणसे समाजाच्या भल्यासाठी असामान्य कामगिरी पार पाडतात. आपण ‘वेगळे’ काम करत आहोत हा अहंभाव त्यांच्या मनाला स्पर्शदेखील करत नाही इतक्या सहजपणे ते समाजात वावरतात.
अशी माणसे समाजाची जगण्याची उमेद वाढवतात. इतरांसाठी प्रेरणादायी ठरतात. ‘हे जीवन सुंदर आहे’ याचा आविष्कार घडवतात. मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातील चित्तोरा गावच्या सरकारी शाळेत एक जिवंत बॉम्ब सापडला.
बॉम्ब विल्हेवाट पथक पोहोचायला वेळ लागणार होता. शाळेत 400 विद्यार्थी होते. पोलीस हवालदार अभिषेक पटेल यांनी त्वरित निर्णय घेतला. बॉम्ब खांद्यावर घेत एक कि.मी. अंतरावर नेऊन टाकला.

स्वत:चा जीव धोक्यात घालत त्यांनी विद्यार्थ्यांचे प्राण सुरक्षित करण्याची खबरदारी घेतली. देशभर धार्मिक विद्वेषाच्या घटना घडत आहेत;

पण गुजरातमधील उलेमा-ए-हिंद संघटनेच्या स्वयंसेवकांनी धार्मिक सौहार्दाचे उदाहरण उभे केले आहे. पुरामुळे अस्वच्छ झालेली मंदिरे व मशिदींची स्वच्छता मोहीम त्यांनी राबवली.

या स्वयंसेवकांचे कौतुक पंतप्रधानांनी ‘मन की बात’मधूनदेखील केले आहे. दौंड तालुक्यातील केडगावमध्ये ‘एक मंडळ एक वृक्ष’ उपक्रम राबवला गेला. 22 मंडळांनी ग्रामदैवतांच्या मंदिरांच्या परिसरात 22 औषधी वृक्षांचे रोपण केले आहे.

नांदगाव-मनमाड परिसरातील 223 गावांत ‘एक गाव एक गणपती’ संकल्पना राबवली गेली आहे. कौटुंबिक न्यायालयात कुटुंबव्यवस्थेशी संबंधित खटले चालतात.

अनेकदा विविध कारणांमुळे पालकांबरोबर बालकांनाही न्यायालयात यावे लागते. त्यांची साक्ष कौटुंबिक वादात महत्त्वाची मानली जाते. या सगळ्या सोपस्कारात मुलांची विलक्षण फरफट होते. मुले न्यायालयात दिवसभर थांबून कंटाळतात.

हे लक्षात घेऊन दिल्लीतील सर्व कौटुंबिक न्यायालयात मुलांसाठी खेळघर निर्माण केले गेले आहे. या खेळघरात मुलांना वेळेनुसार खाऊही दिला जातो.

अवयवदानाची चळवळ रुजवण्यासाठी राज्य शासन आणि आयएमए या डॉक्टरांच्या संघटनेने संयुक्तपणे पुढाकार घेतला आहे.

अवयवदान करणार्‍या व्यक्तीच्या कुटुंबियांना शासकीय रुग्णालये, मेडिकल कॉलेज, आयएमएच्या राज्यभरातील 40 हजार सदस्यांची रुग्णालये येथे मोफत उपचार मिळू शकणार आहेत.

स्वत:साठी जगत असताना समाजासाठी जगणेही आनंददायकच असते हे सिद्ध होण्यास यामुळे मदत होईल. म्हणून हे सगळे उपक्रम प्रेरणादायी ठरतात.

त्यापासून अनेकांना प्रेरणा मिळेल आणि सामाजिक उपक्रमांचा हा वेलू गगनावर जाईल, अशी आशा वाटू लागते.

 

LEAVE A REPLY

*