महिलांनी खंबीर व्हावे !

0

कोपर्डी घटनेतील दोषींना अखेर फाशीची शिक्षा सुनावली गेली आहे. या निकालाने पीडितेला व तिच्या कुटुंबियांना न्याय मिळाल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.

यामुळे पीडितेच्या आईचे दु:ख मात्र न संपणारे असले तरी त्यांनी व्यक्त केलेली संवेदनशील प्रतिक्रिया महिलांचे बळ वाढवणारी आहे हे नक्की!

‘फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी व्हावी यासाठी मी शेवटपर्यंत लढा देणार आहे. कोणावरही अत्याचार होऊ नयेत यासाठी भविष्यात दक्ष राहीन.

दुदैर्वाने असा प्रसंग ओढवलाच तर पीडित छकुल्यांच्या व त्यांच्या कुटुंबांच्या मदतीसाठी धाव घेईन’ असे पीडितेच्या आईने म्हटले आहे. समाजात ‘मला काय त्याचे’ ही वृत्ती दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.

या वृत्तीमुळेच गुन्हेगारांची हिंमत बळावत आहे. चालत्या रेल्वेत, भर दिवसा फूटपाथवर बलात्कार होतात. समोर गुन्हा घडत असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले जाते.

अपघातग्रस्तांना मदत करण्याऐवजी त्याचे चित्रिकरण केले जाते. माणसांची मने इतकी मुर्दाड का बनत चालली आहेत? गुन्ह्यांप्रती लोक उदासीन का होत चालले आहेत?

‘मला काय त्याचे’ या वृत्तीचा समाजाने त्याग केला नाही तर सामाजिक सुरक्षितता धोक्यात येते हे कोपर्डीसारख्या अनेक घटनांनी अधोरेखित केले आहे.

दुर्दैवी घटना घडल्या तर पोलीस गुन्हेगारांना पकडतील. त्यांना न्यायालयात शिक्षाही होईल; पण यामुळे अशा दुर्घटनांवर अंकुश ठेवला जाईल हा समाजाचा भ्रम आहे.

मानवी संवेदना जोपर्यंत जागृत होत नाहीत, गुन्हे रोखण्यासाठी मदतीचे हात जोपर्यंत पुढे येत नाहीत व गुन्हे घडूच नयेत यासाठी समाज जागरुक होत नाही तोपर्यंत गुन्ह्यांची संख्या घटणार नाही हेच याचे मर्म आहे.

जे छकुलीच्या मातेने ध्यानी घेतले असावे. महिलांवरील अत्याचाराच्या घटनांचे प्रमाण वाढत आहे. याचा अप्रत्यक्ष परिणाम मुलींवर बंधने लादण्यात होऊ लागला आहे. जे योग्य नाही.

कोपर्डी घटनेतील दुर्दैवी मुलीची आरोपींनी गुन्हा घडण्यापूर्वी एक-दोन दिवस आधी छेड काढली होती. त्यामुळे घाबरून मुलगी दोन दिवस घराबाहेरच पडली नव्हती.

या घटनेविषयी तिने पालकांशी संवाद साधला होता की नाही हे कळावयास मार्ग नाही. पालक आणि मुलांमधील संवाद-सहवास वाढायला हवा.

जेणेकरून पाल्यांमधील बदल-अस्वस्थता पालकांच्या लक्षात येऊ शकेल. मुलींवर बंधने लादण्यापेक्षा त्यांची मानसिकता कणखर बनवायला हवी.

संकटांचा सामना करण्यासाठी त्यांना बळ द्यायला हवे. काहीही झाले तर पालक पाठीशी आहेत, असा ठाम विश्वात द्यायला हवा.

यासाठी महिला विशेष भूमिका बजावू शकतील. अन्यायाचा प्रतिकार करण्याची हिंमत खरेच वाढली व महिला खंबीर झाल्या तर कोपर्डी निकालाचे नक्की चीज होईल.

LEAVE A REPLY

*