फक्त कबुलीने काय साधणार?

0

देशातील महामार्गांवर बांधण्यात आलेले 147 पूल सध्या धोकादायक स्थितीत आहेत. ते कधीही कोसळू शकतात. यापैकी 18 पूल महाराष्ट्रातील आहेत. सरकार या पुलांवर केल्या जाणार्‍या खर्चाचा अभ्यास करणार आहे.

त्यानंतर कोणत्या पुलांची डागडुजी करायची आणि कोणते पूल पाडून नवीन बांधायचे याचा निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत बोलताना दिली.

या माहितीसाठी त्यांनी वाहतूक मंत्रालयाच्या एका अहवालाचा हवाला दिला आहे. सध्या जीर्णावस्थेत असलेले सर्व पूल 185 वर्षांपूर्वीचे असल्याचे इंडियन फाऊंडेशन ऑफ ट्रान्सपोर्ट रिसर्च अ‍ॅण्ड ट्रेनिंगचे वरिष्ठ अधिकारी एस. पी. सिंह यांनी म्हटले आहे.

तरीही जीर्णावस्थेतील पुलांवरुन वाहतूक सुरू आहे. या पुलांवर दुर्घटना घडण्याची शक्यता खुद्द मंत्र्यांनीच व्यक्त केली आहे.

जनतेच्या दुर्दैवाने अशी दुर्घटना घडली आणि त्यात मनुष्य व वित्तहानी झाली तर त्याची जबाबदारी नेमकी कोणाची मानता येईल?

यातील किती मार्गांवर टोल भरला जातो? सरकारकडे किती महसूल जमा होतो? सरकारचा नुसता कबुलीजबाब भविष्यातील दुर्घटना थांबवू शकेल का?

सरकारचा निर्णय होईपर्यंत प्रवाशांनी या पुलांचा दैनंदिन वापर स्वत:हून बंद करणे यंत्रणेला अपेक्षित आहे का? असे अनेक प्रश्न सरकारच्या कबुलीजबाबानंतर निर्माण झाले आहेत.

महाड दुर्घटना घडली तेव्हा सर्व ब्रिटिशकालीन पुलांचे ऑडीट केले जाईल, अशी घोषणा सरकारतर्फे करण्यात आली होती. तसे ऑडीट झाले का?

पाहणीचे कोणते निष्कर्ष समोर आले? महाड दुर्घटनेतील दोषींवर काय कारवाई झाली? याविषयीचा खुलासा अद्याप जनतेसमोर आलेला नाही.

मुंबई-गोवा महामार्गावरील 13 ब्रिटिशकालीन पूल अद्यापही दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत. कंत्राटदार आणि यंत्रणेच्या लागेबांध्यांविषयी नेहमीच बोलले जाते.

सायन-पनवेल महामार्गावरील टोलप्रकरणी सार्वजनिक बांधकाम खात्यातील अधिकार्‍यांचे उखळ पांढरे झाल्याची कबुली राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीच दिली आहे.

या महामार्गावरील टोल तब्बल 500 कोटींनी वाढवला गेला होता. या पार्श्वभूमीवर यंत्रणेचे जनतेला येणारे अनुभव असत्य मानले जातील का? जनतेच्या अनुभवातही तथ्यांश असेल असे गृहित धरणे चूक ठरू नये.

जीर्ण झालेले पूल वापरात असल्याने जनतेचा जीव टांगणीला लागला आहे. या पुलांसंदर्भात सरकारी खाक्या न अवलंबता तातडीने निर्णय घेतले जातील, अशी अपेक्षा जनतेने करावी का?

 

 

LEAVE A REPLY

*