कायद्याने प्रश्न सुटतील?

0
मुलगा आणि सुनेकडून दिल्या जाणार्‍या अपमानास्पद वागणुकीमुळे 80 वर्षांच्या पित्याने कौटुंबिक न्यायालयाकडे धाव घेतली. या प्रकरणात ज्येष्ठ नागरिकाला दिलासा मिळाला आहे. मुलांनी पित्याचा सन्मानपूर्वक सांभाळ करावा, असा आदेश न्यायालयाने नुकताच दिला आहे.
भारतीय कुटुंबव्यवस्थेचा विचार करता न्यायालयाचा निर्णय स्वागतार्ह आहे. कारण भारतीय संस्कृतीत मुलांनी पालकांचा सांभाळ करण्याचे संस्कार लहानपणापासून बिंबवले जातात.
समाजाने तर ते गृहीत धरलेलेच आहे; पण या मुद्याचा केवळ पालक आणि अपत्ये इतकाच मर्यादित विचार करणे योग्य ठरेल का?

प्रत्येक घरातील परिस्थिती वेगळी. प्रश्न वेगळे आणि त्यांचे निराकरण करण्याची विचारपद्धतीसुद्धा वेगळी आढळते. शिवाय काळाबरोबर समाज सर्वार्थाने बदलत आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या अफाट विस्तारामुळे जग जवळ येत आहे.

मानले तर ‘हे विश्वचि माझे घर’ या ज्ञानेशांच्या उक्तीचा अनुभव देत आहे. जीवनशैली, आचार-विचार, आहार-विहार तर बदललेच; पण विचार करण्याची पद्धतसुद्धा बदलत आहे. नवी पिढी पाश्चिमात्य संस्काराला सरावत आहे.

प्रश्नांचे स्वरूप बदलत आहे. या घुसळणीचा परिणाम मूल्यसंस्कारांवर व धारणांवर होण्याची अपरिहार्यता नाकारता येईल का? पालक आणि मुले या नातेसंबंधातसुद्धा मूलभूत विचार बदलत आहे.

कुंभमेळा, यात्रांमध्ये वयस्कर आई-वडिलांना सोडून मुले पळ काढतात. मध्यंतरी एका मुलाने आजारी आईला रुग्णालयाच्या दारात सोडून दिले होते. मुलांचे पालकांप्रती हे वर्तन टोकाचे असंवेदनशीलच आहे; पण कित्येक आई-वडील आपल्या वर्तनाने मुलांची कसोटी पाहत असतात हे चित्रही समाजात वाढत्या प्रमाणात आढळत आहे.

परिस्थितीनुसार स्वत:ला न बदलता आम्ही म्हणू तेच खरे, असा अट्टाहास असणारे पालक मुलांसमोर अनेक अडचणी निर्माण करताना आढळतात.

जीवनपद्धतीतील बदल स्वीकारण्याची त्यांची तयारी का नसावी? तरीही अनेक सुसंस्कारीत मुले आडमुठे म्हणावे अशा पालकांचा सांभाळ ममत्वाने करत आहेत हे वास्तव नजरेआड कसे करावे? आई-वडिलांना सोडून देणार्‍या मुलांचा जसा समाचार घेतला जातो तसे आजी-आजोबा, आई-वडिलांना सांभाळणार्‍या मुलांचे कौतुक करणे बदलत्या परिस्थितीच्या रेट्याने आवश्यक नाही का? कौटुंबिक मूल्यव्यवस्था टिकवणे अथवा संस्कारांचे संवर्धन ही फक्त एकाच घटकाची जबाबदारी मानणे योग्य ठरेल का? दोन पिढ्यांत वैचारिक संघर्ष अभिप्रेतच आहे; पण पिढी दरपिढी सांधा जुळलेला राहण्यासाठी संबंधित सर्वच घटकांच्या सहकार्याची व मर्यादित का होईना; पण त्यागाची गरज असते. हे वास्तव न्यायालयाने लक्षात
घेतले असेल का?

 

 

LEAVE A REPLY

*