उत्सव निर्धोकही व्हावेत !

0

कोल्हापूर परिक्षेत्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे ग्रामीण व सोलापूर ग्रामीण या पाच जिल्ह्यांत डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाने घेतला आहे.

भारतीय संस्कृतीला सार्वजनिक सणावारांची समृद्ध परंपरा लाभली आहे. समाजाने सर्व भेदाभेद विसरत एकत्र यावे, विविध विषयांवर विचारमंथन व्हावे, जनजागृती घडावी हा अनेक सण सार्वजनिकरीत्या साजरे करण्यामागचा खरा उद्देश आहे.

अनेक सामाजिक संस्था, सार्वजनिक मंडळे याच उद्देशाने काम करतात. जनजागृतीचे विषय हाताळतात. उत्सव आणि ध्वनी यांचा समतोल राखत देखावे सादर करतात.

पण अशा मंडळांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच राहिली आहे. सार्वजनिक मंडळांना राजकारण्यांचे आशीर्वाद लाभायला सुरुवात झाल्यानंतर सगळेच सण ‘आवाजी’ होत चालले असावेत का?

राजकारण्यांच्या छुप्या पाठिंब्यामुळे सण साजरे करण्याची पद्धती बदलत चालली असावी का? कोणाचे मंडळ दणदणाटी उत्सव साजरा करते या सुप्त इर्षेपोटी उत्सवांना अनिष्ट वळणे लागत चालली आहेत हे वास्तव कोण नाकारू शकेल?

गणेशोत्सवात बिनबोभाट सुरू राहणार्‍या अनिष्ट ‘नाल’ प्रथेला कोणाचे आशीर्वाद असतात हे जनतेपासून लपून राहिलेले नाही.

दरवर्षी गणेशोत्सव नालमुक्त करण्याच्या घोषणा होतात आणि लगेच त्या हवेत का विरत असाव्यात? मानवी जीवनात ध्वनिप्रदूषणाचे दुष्परिणाम 70 डेसिबलनंतर सुरू होतात.

यानंतरचा आवाज कानावर पडला तर सर्वसामान्यांच्या आरोग्यावर धोकादायक परिणाम होतात. तात्पुरता, क्वचित कायमचा बहिरेपणा, रक्तदाब, हृदयरोग, मधुमेह अशा नानाविध आजारांचा सामना नागरिकांना करावा लागतो.

हे आता सामान्य माणसांनाही अवगत झाले आहे. त्यामुळे त्यांचा आवाजी उत्सवाला पाठिंबा असू शकेल का? मग आवाजाची मर्यादा ओलांडण्याची, कानठळ्या बसवणार्‍या डीजेची हौस नेमकी कोणाला असते? याचा शोध कोणी घ्यावा?

याकामी कोल्हापूर पोलीस प्रशासनाने घेतलेला पुढाकार स्वागतार्ह आहे. हा उत्सव साजरा करणार्‍या सामान्य जनतेला उत्सवादरम्यान समाजकंटकांचा त्रास सहन करावा लागतो. महिलांना अनेकदा गैरप्रकारांना सामोरे जावे लागते.

चोर-दरोडेखोर याच काळात सक्रिय होतात. आगामी गणेशोत्सव सर्वार्थाने निर्धोक पार पडावा यासाठी पोलीस प्रशासनाने कंबर कसली असेल अशी अपेक्षा आहे.

समाजहितैषी निर्णय अंमलात आणण्यासाठी समाजानेही सहकार्याचा हात पुढे करायला हवा. समाजकंटकांकडून अशा निर्णयांना भेदाभेदाचे रंग देण्याचा प्रयत्न होऊ शकेल. तसे झाल्यास तो प्रयत्न हाणून पाडण्यासाठी समाजालाच पुढे यावे लागेल.

 

 

LEAVE A REPLY

*