खंडाळा घाटात रेल्वेतून पडून अभियंत्याचा मृत्यू

0
जळगाव । दि.1 । प्रतिनिधी-पुण्याहून मुंबईकडे जाणार्‍या इंटरसिटी एक्सप्रेसमधून खंडाळा घाटातील मंकीहिल ते ठाकूरवाडा दरम्यान हात सटकून धावत्या रेल्वेतून खाली पडल्याने जळगावच्या युवा अभियंताचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना दि.31 रोजी रात्री 7 वाजेच्या सुमारास घडली.
याबाबत नातेवाईकांकडून मिळालेली माहिती अशी, नुतन मराठा महाविद्यालयाच्या मागील बाजुस असलेल्या गल्लीत डॉ. संजय चिंचोले यांचे निवासस्थान आहे.

त्यांचा मुलगा तुषार चिंचोले यांने अभियांत्रिकीचे शिक्षण नुकतेच पूर्ण करून कामानिमित्त तो पुणे येथे गेले होता.

तो सध्या पुणे येेथे कामाला असल्याने तो दि.31 रोजी सायंकाळी पुण्याकडून मुंबईकडे जाणार्‍या इंटरसिटी एक्सप्रेसमधून ठाणे येथे जाण्यास निघाला होता.

दरम्यान खंडाळा घाटातील मंकीहिल ते ठाकूरवाडा दरम्यान त्याचा हात सटकल्याने धावत्या रेल्वेतून खाली पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

रेल्वेतून खाली पडल्याने त्याचा मोबाईल देखील बंद झाला होता. त्यांच्या बॅगेतील कागदपत्र व मोबाईलवरून मध्यरात्री 3 वाजेच्या सुमारास त्याची ओळख पटविण्यास लोणावळा लोहमार्ग पोलिसांना यश आले.

तुषारच्या अपघाती मृत्यूप्रकरणी लोणावळा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तुषार हा एकलुता एक मुलगा असून त्यांच्या पश्चात आजी, आई-वडील, काका-काकू, बहीण असा परिणार आहे.

सायंकाळपासून तुषारचा मोबाईल बंद
तुषार रेल्वेने पुण्याहून मुंबईकडे जाण्यासाठी दि.31 सायंकाळी निघाला होता. तो रेल्वेत असल्याने कुटुंबियांचा त्याच्याशी संपर्क होवू शकला नव्हता.

घटना घडल्यानंतर त्याचा मोबाईल स्विच ऑफ झाल्याने रात्री उशिरापर्यंत कुटुंबियांनी त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. दरम्यान रात्री 3 वाजेच्या सुमारास त्याच्या फोन सुरु होवून संपर्क झाला.

यावेळी फोन लोणावळा लोहमार्ग पोलिसांनी उचलून मोबाईलधारकाचा रेल्वेतून पडून मृत्यू झाला असल्याचे सांगताच कुटुंबियांच्या पायाखालील जमीनच सरकली.

तुषार क्रिकेटचा राष्ट्रीय खेळाडू
तुषार चिंचोले याचे शिक्षण ला.ना. विद्यालयातून झाले असून तो शाळेकडून क्रिकेट खेळत असायचा. शाळांतर्गत होणार्‍या राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत तुषार सहभागी झाला होता. तसेच त्याने जिल्हयाच्या क्रिकेट स्पर्धेत त्याने आपले वर्चस्व सिध्द केले.

 

LEAVE A REPLY

*