एकच प्याला

0

मद्यपानामुळे जेव्हा माणसाच्या व्यावहारिक कामावर, शरीर-संसार आणि सामाजिक जीवन यांच्यावर विपरित परिणाम होतो तेव्हा त्याला दारूच्या आहारी जाणे म्हणजेच ‘मद्याधीनता’ म्हणतात.

शारीरिक घडणीवर विघटनाचा परिणाम
मद्याधीनतेची सुरुवात कधीतरी घेणे, थ्रिल म्हणून घेणे, संगत म्हणून घेणे यानेच होते. अर्थात सगळेच मद्य घेणारे मद्याधीन होतातच असे नाही.

याबाबत एक विचार असा आहे की, काही लोकांची मानसिक घडणच व्यसनाधीन होण्याकडे असते. दुसरा विचार असा की, काही जणांची शारीरिक घडण अशी असते की, मद्य पोटात शिरून त्याचे विघटन होताना त्यांच्या शरीरात एन्डार्फिन हा अफूसारखा एक विशिष्ट झिंग आणणारा पदार्थ बनतो.

डॉ विकास गोगटे

त्या अफूसारख्या पदार्थानेच त्या लोकांना दारूचे व्यसन लागते. बरे, अशी शरीरप्रकृती कोणाची असते हे आधी ओळखता येत नाही. त्यामुळे कोणाला त्याचे व्यसन लागेल याचा अंदाज आधीच करता येत नाही.

मद्यपीच्या बाबतीत आनुवंशिकता नियम लागू शकतो. म्हणून ज्यांच्या घराण्यात मद्यपी होते, अशांनी ‘एकच प्याला’ला कधीही शिवू नये.

मद्य शरीरातील मज्जा संस्थेवर वाईट परिणाम करून आपले कार्य करते आणि ते मज्जासंस्थे उत्तेजित करून नव्हे तर तिचे कार्य मंद करून करत असते.

मात्र जनसामान्यात मद्य उत्तेजन आणते असा गैरसमज प्रचलित आहे. मेंदूतील हालचाली घडवून आणणार्‍या भागावर मद्याचा अधिक परिणाम दिसत असल्याने चालणे, बोलणे, कुशल कारागिरी करणे यामध्ये जाणवण्याइतपत दोष निर्माण होतो. अर्थात हे दोष प्यायलेल्या व्यक्तीला जाणवत नाहीत. तर आजूबाजूस असलेल्या ‘सोबर’ व्यक्तीस जाणवतात.

जुनाट मद्यपी माणसाला कसे ओळखणार?
जुनाट मद्यपी माणसात आढळणारी दोन प्रमुख लक्षणे आहेत. एक म्हणजे नशा, झिंग येण्यासाठी वाढते माप लागणे व दुसरे, दारुचा अंमल संपल्यानंतर हाताला कापरे सुटणे व तो कंप परत मद्य पिण्याने कमी होणे. आपण खरोखरच मद्यपी झालो की काय, हे ओळखण्यासाठी एक तपासणी आहे. त्यामध्ये मद्यपी व्यक्तीला एक प्रश्नावली देतात.
1) बरोबरीच्या लोकांपेक्षा जास्त घेता का?
2) कालच्या मद्याचा हँगओव्हर घालवण्यासाठी आज पिता का?
3) आपण एकटे पिता का?
4) आपण दु:खाच्या प्रसंगी पिता की आनंदाच्या प्रसंगी?
अशा पद्धतीचे दहा प्रश्न असतात. त्यापैकी जर 4 उत्तरांना या अधिकांना आपले उत्तर होकारार्थी असेल तर आपण मद्यपी बनण्याची शक्यता अधिक असते. एकदा दारू सोडलेल्यांनी आता मी ‘मर्यादित’ घेत राहीन असे न म्हणता, त्या वाटेलाच न गेलेले चांगले! कारण तो ‘एकच प्याला’ त्या व्यक्तीला पुन्हा मद्याधीनतेकडे नेतो.

जुनाट मद्यपी माणसाला दारू न मिळाल्यास जीव घाबरणे, दचकायला होणे, खूप गळून गेल्यासारखे वाटणे, झोप न येणे अशी लक्षणे दिसतात.

त्यामध्ये फीटही येऊ शकते. वेळीच उपचार न मिळाल्यास मृत्यूही येऊ शकतो. त्यांना डॉक्टरी सल्ल्याने गुंगीचे औषध देणे हाच ताबडतोबीचा इलाज आहे. मद्य परवान्यासाठी देण्याच्या डॉक्टरी प्रमाणपत्रात एक मजेदार वाक्य आहे ते असे, यांचे आरोग्य टिकवण्यासाठी यांना दारू आवश्यक आहे.

दारू सोडा बरोबर, पण दारू आणि ‘सोडा’ चूक
कोणाला दारूचे व्यसन लागते ते आधी सांगता येत नसल्याने, शहाण्याने त्याच्या वाटेलाच न जाणे चांगले. ज्यांना असे व्यसन लागले आहे ते सोडवण्यासाठी त्यांना मानसिक, सामाजिक बळ देण्यासाठी जवळचे मित्र, नातेवाईक, बायको व फॅमिली डॉक्टर यांचा सहभाग महत्त्वाचा असतो.

अतिरिक्त मद्यपानाने शरीराचे कुपोषण झालेले असते. त्यामुळे उपचारात प्रथिने व जीवनसत्वे यांचा भरपूर वापर आवश्यक ठरतो.

‘मुक्तांगण’ सारख्या संस्थेमध्ये रुग्णांना भरती करून इतर मद्यपींच्या बरोबर राहून मानसोपचार करून दारू सोडवता येते.

‘अल्कोहोलिक अ‍ॅनॉनिमस’ ….ए.ए.) सारख्या संस्थेत मद्यपान सोडलेले, बरे झालेले मद्यपी एकत्र जमून दारू सोडण्याने आपला काय फायदा झाला याचे अनुभव सांगतात. त्यामुळेही दारू सोडण्यास उपयोग होतो.

औषध न लगे मजला
नाशिकच्या ए.ए.चे लोक दर बुधवारी व शनिवारी सायंकाळी 7 वा. आय.एम.ए. हॉल, शालिमार चौक येथे जमतात. असेच प्रत्येक गावी ए.ए. संस्थेच्या सभा भरत असतीलच.

अँटाबूज थेरपी केवळ डॉक्टरी सल्ल्यानेच करता येते. वरील सर्व उपचार लागू होण्यासाठी रुग्णांची जबरदस्त मानसिक इच्छा महत्त्वाची असते.

तशी मानसिक इच्छा नसल्यास त्याच्याशी प्रेमाने, विश्वासाने वागून ती संबंधित व्यक्ती निर्माण करू शकतात.

शेवटी थोडी गंमत- एक रुग्ण डॉक्टरकडे पोट दुखते म्हणून तपासणीसाठी गेला. डॉक्टर त्याला तपासतात. पण त्यांना त्याच्या आजाराचे नक्की कारण सापडत नाही.

ते म्हणतात, ‘हे बघ मला आताच नक्की काही सांगता येत नाहीये. पण बहुधा दारूचा परिणाम असावा.’ त्यावर रुग्ण म्हणतो, ‘ठीक आहे. डॉक्टर आपली ‘उतरल्यानंतर’ मी परत तपासायला येतो.’

LEAVE A REPLY

*