अकरावीच्या प्रवेशप्रकियेसाठी पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांची गर्दी

0
जळगाव । दि.27 । प्रतिनिधी-अकरावी प्रवेश प्रकियेला आजपासून सुरवात झाली. प्रवेशाच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांनी शहरातील महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी गर्दी केली.
प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात अर्ज भरून जमा केले असून गुणवत्तायादी नुसार विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे. पहिली यादी दि.3 रोजी जाहीर करण्यात येणार आहे.
यंदा देखील अकरावी प्रवेश प्रकिया ऑफलाईनच असून प्रवेशासाठी 24 ते 29 पर्यंत अर्ज भरण्याची मुदत देण्यात आली आहे. दि.24 रोजी विद्याथ्यार्ंना गुणपत्रकाचे वितरण करण्यात आले.

दि.25 व 26 रोजी सुट्टी आल्याने आजपासून खर्‍या अर्थाने प्रवेश प्रक्रियेला सुरवात झाली. शहरातील मुळजी जेठा महाविद्यालय, नुतन मराठा महाविद्यालय, डॉ. अण्णासाहेब जी.डी. बेंडाळे महिला महाविद्यालय, अ‍ॅड. बबनभाऊ बाहेती महाविद्यालय, धनाजी नाना चौधरी महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी पहिल्याच दिवशी प्रवेशासाठी लगबग दिसून आली.

विज्ञान शाखेकडे विद्यार्थ्यांचा अधिक कल असल्याने शहरातील सर्व महाविद्यालयांमध्ये गर्दी केली होती. मूळजी जेठा महाविद्यालयात विज्ञान व वाणिज्य शाखेच्या प्रवेशासाठी दि.3 रोजी पहिला गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे.

मू.जे महाविद्यालयात विज्ञान शाखेच्या 1080 जागा, वाणिज्य शाखेच्या 600 तर कला शाखेच्या 120 जागा आहे.

नुतन मराठा महाविद्यालयात देखील विज्ञान शाखेत प्रवेश घेवू इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांची दि.3 रोजी पाहिली यादी जाहीर करण्यात येणार आहे.

त्याचप्रमाणे वाणिज्य व कला शाखेसाठी विद्यार्थ्यांना थेट प्रवेश दिले जात असल्याचे कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. एस.डी. सुर्वे यांनी सांगितले.

धनाजी नाना महाविद्यालयात विज्ञान शाखेच्या 240 जागा असल्याने विद्यार्थ्यांचा महाविद्यालयांकडे अधिक कल दिसून येत आहे.

त्यांचबरोबर अण्णासाहेब डॉ. जी.डी बेंडाळे महाविद्यालयात देखील विद्यार्थींनी पहिल्याच दिवशी प्रवेशासाठी गर्दी केली होती. बेंडाळे महाविद्यालयात कला, वाणिज्य व विज्ञान शाखेच्या 220 जागा आहे. शहरातील महाविद्यालयांमध्ये 4 हजार 800 जागा ह्या अनुदानित तर 2 हजार 650 जागा हया विनाअनुदानित असून यंदा सर्वच महाविद्यालयांमध्ये मुबलक प्रमाणात अकरावी प्रवेशाच्या जागा उपलब्ध आहे.

10 वी परिक्षेत अनुउत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मिळणार प्रवेश
दहावीच्या परिक्षेत दोन विषयात अनुउत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना अकरावीत कला व वाणिज्य शाखेत प्रवेश मिळणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी 10 वीच्या परिक्षेचा फार्म भरल्याचा दाखला व विद्यालयातील मुख्याध्यापकांचे शिफारस पत्र दयावे लागणार आहे.

विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी धावपळ
अकरावीच्या प्रवेशासाठी दि.24 ते 29 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. 25 व 25 रोजी सुट्टी आल्याने विद्याथ्यार्ंचे दोन दिवस वाया गेले होते. सुट्टीनंतरच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात गर्दी केली होती. दरम्यान दि.28 व 29 हे शेवटचे दोन दिवस असल्याने विद्यार्थ्यांची चांगलीच धावपळ होणार आहे.
दरम्यान प्रवेशासाठी मुदत वाढविण्यात यावी अशी मागणी विद्याथ्यार्ंमधून होत आहे.

 

LEAVE A REPLY

*