आंतरराष्ट्रीय क्रीडापटू श्रद्धा घुले उद्या अडकणार लग्नबंधनात

0
अकोले (प्रतिनिधी) – आंतरराष्ट्रीय क्रीडापटू, महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त व अकोले – संगमनेरची सुवर्णकन्या म्हणून प्रसिद्ध असलेली श्रद्धा भास्करराव घुले उद्या शनिवार दिनांक 9 डिसेंबर रोजी पाटोळे (ता. सिन्नर, जि. नाशिक) येथील रवींद्र खताळे आय.ए.एस (भारतीय प्रशासकीय सेवा) यांच्याशी संगमनेर येथील मालपाणी पॅलेस येथे सायंकाळी गोरज मूहर्तावर होणार्‍या शाही विवाहात लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. रविंद्र ज्ञानेश्वर खताळे आयएएस परिक्षा उत्तीर्ण आहेत. सध्या ते गुजरातमध्ये जिल्हाधिकारी पदावर कार्यरत आहेत. विवाहसोहळ्याची संगमनेर येथे जय्यत तयारी सुरू आहे.
18 मे 2017 रोजी त्याांचा साखरपुडा विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला होता. श्रद्धा घुले हिने आतापर्यंत देश-विदेश व राज्य पातळी वरील विविध स्पर्धांमध्ये 61 सुवर्णपदकांसह 132 पदकांची कमाई केली आहे़ शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार, ज्युनियर अँड एशियन फिंगर चॅम्पियनशिप अशा विविध पुरस्काराने श्रद्धा घुलेला सन्मानित करण्यात आले आहे. अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक भास्करराव घुले व बुवासाहेब नवले पतसंस्थेच्या संचालिका, कुंभेफळ येथील शेषनारायण विद्यालयाच्या ज्येष्ठ शिक्षिका प्रतिभा घुले यांची ती कन्या आहे.
श्रध्दाने आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्यस्तरीय व विद्यापीठ पातळीवर तिहेरी व उंच उडीत सुवर्ण (गोल्ड), रौप्य (सिल्वर), कास्य (ब्रॉन्झ) असे एकूण 132पदके पटकावली आहेत. 2007 साली पुणे येथे युवा राष्ट्रकुल स्पर्धेत तिहेरी उडीत तिने अगोदरचे सर्व विक्रम मोडीत काढत 13.11 मीटर उडी घेत विश्वविक्रम प्रस्थापित केला. या क्रीडा प्रकाराला आई, वडील व तिचे प्रशिक्षक, चाहते यांचे प्रोत्साहन आहे. श्रद्धाबद्दल अकोले-संगमनेर सह नगर जिल्ह्याला तिच्या कार्य कर्तृत्वाचा अभिमान आहे.
जिल्हाधिकारी रविंद्र यांनी आपल्याला अपेक्षित अशी सर्वगुणसंपन्न पत्नी लाभत असल्याबद्दल समाधान व्यक्त करत या पुढेही तिने आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व करून देशाचे नाव उज्जवल करावे अशी अपेक्षा व्यक्त केली तर श्रद्धा हिने आपणास मनासारखा पती मिळाल्याचे सांगत आपण खूप आनंदी आहोत, आपल्या जीवनातील हा अतिशय आनंदाचा क्षण असल्याची भावना व्यक्त करत लग्नानंतरही आवडत्या क्रीडा प्रकाराचा अधिकाधिक सराव करून आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाला बहुमान मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध असणार असल्याची प्रतिक्रिया श्रद्धा हिने दैनिक सार्वमतशी बोलताना व्यक्त केली.  ख्यातनाम आंतरराष्ट्रीय क्रीडापटू श्रद्धा व जिल्हाधिकारी रविंद्र यांच्या विवाहाची संपूर्ण तयारी आटोपली असून या शाही विवाह सोहळ्याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

*