अवैध गुटखा विक्री होणार अजामीनपात्र गुन्हा, ऑनलाईन औषध विक्रीत डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन अनिवार्य करणार  : ना. बापट

0

ऑनलाईन औषध विक्रीत डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन अनिवार्य करणार  : ना. बापट

अहमदनगर (प्रतिनिधी) – गुटखा बंदी असताना राज्यात गुटखा आणि सुगंधी तंबाखूजन्य सुपारीची विक्री सुरू आहे. गुटखा विक्री करणार्‍या विरोधात मोक्कांतर्गत कारवाई होणे अपेक्षीत आहेत. हा गुन्हा अजामीनपात्र गुन्हा ठरवण्यात यावा यासाठी अन्न व प्रशासन विभागाच्या गृह खात्यासोबत बैठका झाल्या असून हा प्रस्ताव न्याय विधी विभागाकडे पाठविण्यात आला आहे, अशी माहिती राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री गिरीष बापट यांनी दिली.

राज्यात गुटखा विक्री विरोधात कारवाया वाढवण्यात येणार आहेत.राज्यात ड्रग अ‍ॅक्टमध्ये सुधारणा करण्यात येणार आहे. केंद्राकडे याबाबतचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.  ऑनलाईन औषध विक्रीसंदर्भात कांबळे समिती गठीत करण्यात आली होती. त्याचा अहवाल शासन पातळीवर असून औषध दुकानदार आणि ऑनलाईन औषध विक्रेते असा वाद निर्माण झाला आहे.

डॉक्टरांनी औषधे लिहून दिल्याशिवाय औषधांची विक्री होऊ नये, असे अन्न व औषध विभागाचे आदेश आहेत. ऑनलाईन औषध विक्रीत डॉक्टरांच्या प्रिक्रिपशन आवश्यक करणार असून ते ऑनलाईन पोर्टलवर दिसणार आहे. एका प्रिस्क्रिप्शनवर दुसर्‍यांदा औषध मिळणार नाही, असे बापट यांनी स्पष्ट केले.
………..
राज्यातील वजन माप विभागाच्या कामकाजात गतीमानता आणि पारदर्शकता आणण्यासाठी राज्य सरकारने कर्नाटक पॅटन राबवण्याचा निर्णय घेतला आहे. कर्नाटक राज्याने त्या ठिकाणी केलेला प्रयोग राज्यात जसाच्या तसा राबवण्यात येणार असल्याचे बापट यांनी यावेळी सांगितले

अन्न, औषधकडून राज्यातील
आरोग्याच्या सर्व लॅबची मागणी – 
राज्यात अन्न व औषध प्रशासन विभागाला अद्ययावत लॅब उभारण्यासाठी केंद्राने 137 कोटी रुपये मंजूर केले आहेत. यातील पहिला हप्ता प्राप्त झाला असून यातून औरंगाबाद व नागपूरला अद्ययावत लॅब उभारण्यात येणार आहे. राज्यातील आरोग्य विभागाकडील सर्व लॅब कर्मचार्‍यांसह अन्न व औषध विभागाला वर्ग करण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. मात्र, याबाबतचा निर्णय आरोग्य विभाग, अन्न व प्रशासन विभाग आणि मेडिकल शिक्षण विभाग यांना एकत्रित घ्यावा लागणार असल्याची माहिती शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत मंत्री बापट यांनी दिली. यावेळी खा. दिलीप गांधी यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.

सर्व निरीक्षकांना टॅब –
अन्न आणि औषध प्रशासन विभागातील सर्व निरीक्षकांना टॅब देण्यात येणार आहे. या टॅबच्या आधारे ते त्यांचा तपासणी अहवाल ऑनलाईन नोंदवणार आहेत. याचे सॉफ्टवेअर 15 दिवसांत विकसीत करण्यात येणार आहे. अन्न आणि औषध प्रशासन विभागातील 30 टक्के जागा रिक्त असून त्या जागा कर्मचार्‍यांच्या नवीन आकृतिबंधानुसार भरण्यात येणार आहे. कर्जमाफीचा झटका या भरतीला बसणार नसल्याचा विश्‍वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

 

LEAVE A REPLY

*