लेखी आश्‍वासनानंतर साईबाबा पतसंस्थेच्या ठेवीदारांचे उपोषण मागे

0
साकुर (वार्ताहर)-संगमनेर तालुक्यातील साकूर (बिरेवाडी) येथील साईबाबा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या ठेवीदारांनी संगमनेरच्या उपनिबंधक कार्यालयासमोर सुरू केलेले उपोषण सहकारी उपनिबंधकांच्या लेखी आश्‍वासनानंतर मागे घेण्यात आले.
साईबाबा पतसंस्थेत साकूर येथील ठेवीदार भीमराज जाधव, विकास पवार यांनी  ठेव ठेवली होती. त्यामुळे पतसंस्थेतील आमच्या ठेवी तात्काळ देण्यात याव्यात, कलम 88 नुसार जलद चौकशी होऊन दोषींवर गुन्हा दाखल व्हावा व त्यांची प्रॉपर्टी जप्त व्हावी, खाजगी ऑडीटरने पतसंस्थेला ‘अ’ दर्जा दिल्याबाबत व हेतूपुरस्सर चेअरमन व संचालक मंडळाची पाठराखण केल्याबद्दल ऑडीटरची चौकशी होऊन त्वरित गुन्हा दाखल करण्यात यावा, सन 2014 ते 2017 पर्यंतचे संस्थेचे दप्तर सील करण्यात यावे, सर्व तपास पूर्ण करून दोषींवर गुन्हा दाखल होऊन आमच्या ठेवी परत मिळाव्यात अशा विविध मागण्यांसाठी वरील ठेवीदारांनी संगमनेर येथील उपनिबंधक कार्यालयासमोर सोमवार दि. 14 ऑगस्ट पासून बेमुदत उपोषण सुरू केले होते.
या आंदोलनाची तिसर्‍या दिवशी दखल घेत बुधवारी दुपारी 1:30 वाजेच्या सुमारास उपनिबंधक जयेश आहेर व नायब तहसीलदार कुलथे यांनी भेट घेऊन लेखी पत्र दिले. उपनिबंधक यांनी दिलेल्या लेखी पत्रात म्हटले आहे की, पतसंस्थेचे सन 2016-17 या वर्षाच्या लेखापरीक्षण अहवालात संस्थेत झालेल्या अपहार व गैरव्यवहारबाबत अपहार व अनियमितता यामुळे संस्थेचे 2 कोटी 16 लाख 916 इतक्या रकमेचे आर्थिक नुकसान झाले. अहवालात नमूद केल्यानुसार व अहवालानुसार संस्थेत सन 2015-16 या आर्थिक वर्षांत गैरव्यवहार झाल्याचे दिसून आल्याने या कार्यालयाने जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था अहमदनगर यांचेकडे सन 2015-16 चे फेर लेखापरीक्षण आदेश पारीत करणेबाबत विनंती केल्यानुसार जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था अहमदनगर यांनी दि 25/7/2017 रोजी आदेशानुसार फेरलेखापरीक्षणासाठी एस. एस. मेखे (शासकीय लेखापरीक्षक संगमनेर) यांची नेमणूक करण्यात आली असून कामकाज सुरू झाले आहे.
अहवाल प्राप्त झाल्यानंतर अहवालातील नमूद मुद्यांबाबत या कार्यालयाकडून सात दिवसांच्या आत संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे लेखी आश्‍वासन दिल्यानंतर भीमराज जाधव, विकास पवार यांनी उपनिबंधक जयेश आहेर व नायब तहसीलदार कुलथे यांच्याहस्ते लिंबू पाणी घेऊन उपोषण सोडले. यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष काशिनाथ पावसे, राजाभाऊ देशमुख, डॉ. अरुण इथापे, साहेबराव वलवे, बुवाजी खेमनर, सहदेव जाधव आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*