घरांमध्ये शिरले पाणी तर रस्त्यांची लागली वाट

विजेच्या तारा तुटून तीन म्हशी ठार, नुकसानग्रस्त भागाची पाहणी
घरांमध्ये शिरले पाणी तर रस्त्यांची लागली वाट

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

मान्सुनच्या पहिल्याच पावसाने धो-धो धुतल्याने शहरातील देवपूर भागातील रस्त्यांची पूर्णतः वाट लागली. तर प्रभाग क्रं.12 मध्ये नाल्यावर अतिक्रमण केल्यामुळे परिसरातील नागरिकांच्या घरात नाल्याचे पाणी शिरले. आज मनपा अधिकार्‍यांनी या भागाची पाहणी करुन अतिक्रमण काढण्याच्या सूचना केल्यात.

बुधवारी सायंकाळी झालेल्या जोरदार पावसामुळे देवपूरात सुरु असलेल्या भुयारी गटारीच्या निकृष्ठ कामामुळे रस्त्यांची वाट लागली. ठिकठिकाणी खड्डे पडून काही ठिकाणी तर रस्तेच खचले.

तसेच प्रभाग 12 मधील हाजी नगर, जनता सोसायटी, स्लॉटर हाऊस मागील परिसरात या पावसामुळे नाल्याला आलेल्या पुराचे पाणी परिसरातील घरांमध्ये शिरले. त्यामुळे आज उपायुक्त शांताराम गोसावी, सहाय्यक आयुक्त कोते यांनी याभागाची पहाणी केली.

यावेळी नगरसेवक अमिन पटेल, डॉ.सरफराज अन्सारी, मुक्तार मन्सुरी, वसीम मंत्री, मनपा अधिकारी उपस्थित होते. अतिक्रमण काढण्याच्या सूचना संबंधित नागरिकांना देण्यात आल्या. अंबिका नगरातही घरांमध्ये पाणी शिरले.

तीन म्हशी ठार

शहरातील जेलरोडवरील लक्ष्मी वसतीगृह आवारात चरत असलेल्या तीन म्हशींच्या अंगावर वीजेच्या तारा पडल्याने त्या ठार झाल्या. यामुळे मोहन अशोक गवळी या दुग्ध व्यावसायीकाचे नुकसान झाले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com