Video : नाशिक जिल्ह्यात मान्सून बरसला; दोन तासांत 26.6 मि. मी. पाऊस

0
नाशिक । कोकणसह राज्यातील बहुतांशी भागात शनिवारपासून मान्सूनचे आगमन झाले आहे. आगमनातच कोकणातं जोरदार सलामी दिल्यानंतर आज मुंबईतील अनेक भागात सकाळपासूनच जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे.

त्याचबरोबर नाशिक जिल्ह्यात आज काही तालुक्यात मान्सून दाखल झाला असून नाशिक शहर परिसरात झालेल्या जोरदार पावसाने सर्वांची धावपळ उडवून दिली. दुपारनंतर नाशिक शहर परिसरात केवळ दोन तासांत 26.6 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसानंतर आता मान्सून सुरू झाल्याने शेतकरी वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे.

राज्यात दोन दिवस उशिराने मान्सून कोकणासह राज्यात दाखल झाल्यानंतर आता सर्वच जिल्ह्यात पावसाचे वातावरण निर्माण झाले असून मान्सूनपर्व पावसाने निर्माण झालेल्या गारव्यानंतर उन्हापासून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. यातच पुणे वेधशाळेने गेल्या शुक्रवारी राज्यात कोकणासह विदर्भ, मराठवाडा व मध्य महाराष्ट्रात येणार्‍या दोन दिवसांत मेघगर्जनेसह जोरदार पावसांची शक्यता वर्तवली होती.

तसेच शनिवारी पुन्हा वेधशाळेने येत्या 24 तासांत कोकणासह, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भासह मुंबईत मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवला होता. हा हवामान खात्याचाअंदाज खरा ठरला असून रविवारी सकाळपासूनच मुंबईत अनेक भागात पाऊस सुरू झाला आहे. त्यानंतर नाशिक जिल्ह्यात शनिवारी काही भागात पाऊस झाल्यानंतर आज पुन्हा मान्सूनने जोरदार हजेरी लावली.

सकाळपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण असताना उकाडा वाढत गेला. अखेर दुपारी चार वाजेच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. यात नाशिक शहर आणि परिसरात दुपारी सव्वा वाजता आलेल्या पावसाने चांगलेच झोडपून काढले. वादळी वारा आणि विजेच्या कडकडाटासह आलेल्या जोरदार पावसाने नागरिकांची चांगलीच धावपळ उडवून दिली.

काही मिनीटातच रस्त्यावर पाणी वाहू लागले. तर अनेक भागात पावसाचे पाणी साठल्याने त्यांचा परिणाम वाहतुकीवर झाला. सुमारे अर्धा पाऊण तासांनंतर पावसाचा वेग कमी झाला. मात्र रात्री उशिरापर्यत पावसांची रिपरिप सुरू होती.

जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील डुबेरे परिसरात दुपारी पाऊणे चार वाजेच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली. सायंकाळपर्यंत तालुक्यात काही भागात रिमझिम पाऊस सुरू होता. तसेच त्र्यंबकेश्वरसह तालुक्यातील काही गावात देखील पावसाने हजेरी लावली.

 

LEAVE A REPLY

*