हरवणे हत्याकांडातील आरोपी पिपळेची कोठडीत आत्महत्या

0
नेवासा कोठडीतील घटना
नेवासा (प्रतिनिधी) – शेवगाव येथील हारवणे हत्याकांडातील संशयित आरोपी अमोल संतोष उर्फ ईश्‍वर पिंपळे (रा. गिडेगाव, ता.नेवासा) याने पोलीस कोठडीतच गळफास घेऊन आत्महत्या केली. नेवासा पोलीस लॉकअपमध्ये मंगळवारी मध्यरात्रीनंतर घडलेला हा प्रकार आज सकाळी समोर आला. दरम्यान मृत पिंपळे याच्या आईने पोलीस ठाण्याशेजारीच दगडावर डोके आपटून आकांडतांडव केले.
अमोल पिंपळे याला स्थागिक गुन्हे शाखेने शेवगाव येथील हारवणे हत्याकांडात अटक केली होती. नाशिक जिल्ह्यातील नांदगाव आणि पिंपळगाव येथील दरोड्याच्या गुन्ह्यात तो नाशिक पोलिसांना हवा होता. तीन आठवड्यापूर्वी त्याला नाशिक पोलिसांनी नगर पोलिसांकडून त्यांच्या गुन्ह्यात वर्ग केले होते. त्यांच्या चौकशीनंतर चार दिवसांपूर्वीच त्याला नेवासा पोलिसांनी घरफोडीच्या गुन्ह्यात वर्ग करून घेतले. नेवासा कोर्टाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्याने त्याला नेवासा पोलीस ठाण्याच्या कोठडीत ठेवण्यात आले होते. रात्री टॉवेल कात्रून त्याने दोरखंड तयार केला. जवळील आरोपी झोपल्यानंतर या दोरखंडाच्या सहाय्याने त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही माहिती समजताच त्याची आई दुपारी बारा वाजेच्या सुमारास पोलीस ठाण्यात पोहचली. तिने दगडावर डोके आपटून आकांडतांडव सुरू केले. साडीच्या पदराने गळा आवळून,आता मी जगू कशाला असे म्हणत तिनेही जीव देण्याचा प्रयत्न केला. मात्र तेथे असलेल्या महिला पोलिसांनी तिला रोखले. माझा मुलगा चोर्‍या करत नव्हता, तो तुमच्यामुळेच मेला , त्याला तुम्हीच मारले असा आरोप तिने यावेळी केला. त्याचवेळी पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा तेथे आले. त्यांनी पोलीस कर्मचार्‍यांना तिचे शुटींग करण्यास सांगितले. पोलीस ठाण्यात येण्यापासून रोखण्यासाठी त्यांनी प्रवेशद्वारवरच दोन पोलीस नियुक्त केले.
नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात पिंपळे याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यात आला. तेथून मृतदेह इनकॅमेरा शवविच्छेदनासाठी औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात नेण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान दुपारपर्यंत या घटनेची कोणतीच नोंद नेवासा पोलिसांत झाली नव्हती.

चार पोलिसांवर निलंबनाची कारवाई ?
पोलीस कोठडीत आरोपीच्या मृत्युप्रकरणी चार पोलिसांना निलंबनाच्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. लॉकअप गार्ड, ठाणे अंमलदार व अन्य सुरक्षा रक्षक यांच्यावर एसपी शर्मा हे निलंबनाची कारवाई करणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

पिंपळे हा नाशिक, औरंगाबाद, नगर पोलिसांना दरोडे, रस्तालुट व घरफोड्या अशा 14 गुन्ह्यात पाहिजे होता. गत दोन महिन्यापूर्वी शेवगाव येथे हारवणे कुटुंबातील चौघांची हत्या केल्याप्रकरणी पिंपळेला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने बेड्या ठोकल्या होत्या. त्याची चौकशी केली असता त्याच्यावर चार जिल्ह्यात गंभीर गुन्हे दाखल असल्याचे उघड झाले होते.

सीआयडी चौकशी ?
पिंपळे याच्यावर गंभीर स्वरुपाचे 14 गुन्हे दाखल आहेत. शिवाय शेवगाव येथील हारवणे कुटुंबियातील चौघांच्या हत्याप्रकरणी त्याला पोलिसांनी मोठ्या शिताफीने पकडले होते. त्याचा पोलीस कोठडीत मृत्यू झाल्याने हे प्रकरण आता तपासासाठी सीआयडीकडे जाण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली.

LEAVE A REPLY

*