पालकमंत्री राम शिदेंनी चालविला औत!

1
अकोले (प्रतिनिधी)- एखादा कॅबिनेट मंत्री आपला बडेजाव बाजूला सारून अकोले तालुक्यातल्या दुर्गम भागातल्या गावात येतो… आदिवासी शेतकर्‍याच्या घरी मुक्काम ठोकतो… तेथेच जेवण, चहापाणी घेतो, शेतात नांगर धरतो, शेतकर्‍याची, महिलांची आस्थेवाईकपणे चौकशी करतो, लोक प्रश्न विचारतात तेव्हा करतो, बघतो असे पुढारीछाप अश्वासने न देता लगेच अधिकारी मंडळीना सांगून ते प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे आदेश देतोे. एवढेच नव्हे तर त्यांनी शेतात औतही चालविला.
रात्रीचे अकरा वाजलेले असताना, उशिरापर्यंत वाट बघत असलेल्या मवेशी गावातल्या आदिवासींनी लेझीम, झांजपथक, ताशा, संबळ यांच्या गजरात फटाक्यांच्या आतषबाजीत नगर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांचे जंगी स्वागत केले.
पालकमंत्री राम शिंदे हे भाजपच्यावतीने आयोजित शिवार संवाद सभा व पंडित दीनदयाळ उपाध्याय कार्यविस्तार योजना या कार्यक्रमासाठी अकोले तालुक्यातील मवेशी दौर्‍यावर आले होते. या कार्यक्रमात शेतकर्‍यांशी संवाद साधण्या बरोबरच शेतकर्‍याच्या वस्तीवर मुक्काम करून तेथील जनजीवनाचा अनुभव घ्यायचा असे नियोजन आहे. त्यानुसार पालकमंत्री शिंदे मवेशी येथील बारववाडीत मारुती धोंडू जाधव यांच्या वस्तीवर मुक्कामी आले. श्री. जाधव हे जिल्हा परिषद सदस्य डॉ. किरण लहामटे यांचे सासरे आहेत. त्या निमित्त पालकमंत्री प्रा. शिंदे यांचे जंगी स्वागत करण्यात आले.
श्री.जाधव यांनीही पाहुणे येणार, त्यातही पालकमंत्री म्हटल्यावर त्यांच्यासाठी मस्त पुरणपोळीचा बेत केला होता. सार, भात, भजे, कुरडईचा पालकमंत्री प्रा. शिंदे यांनी आस्वाद घेतला. त्यानंतर मिट्ट काळोखात शतपावली करत काजवे पाहण्याचाही आनंद घेतला.
सकाळी बारववाडी ते मवेशी हे दोन किलोमीटर अंतर पायी चालत येताना तुकाराम हनुमंता जाधव यांच्या शेतात नांगरणी चालू होती. मंत्री महोदयांना लाकडी नांगर हाकण्याचा मोह आवरता आला नाही. कसलेल्या शेतकर्‍याप्रमाणे त्यांनी शेतात नांगर धरला. गावातील वृद्ध महिलेची आस्थेवाईकपणे चौकशी केली. एकटी निराधार आहे असे समजल्यानंतर श्रावण बाळ निराधार योजनेचा तिला लाभ देण्याचे तहसीलदार यांना आदेश दिले.
विहिरीवर शेंदून पाणी भरणार्‍या महिलांची अडचण विचारली. पिण्याच्या पाण्याची त्यांनी आस्थेवाईकपणे चौकशी केली. यानंतर शेतकर्‍यांशी संवाद साधला. यावेळी जिल्हा परिषद गटनेते जालिंदर वाकचौरे, झेडपी सदस्य डॉ किरण लहामटे, भाजप तालुका अध्यक्ष सीताराम भांगरे, सरचिटणीस भाऊसाहेब वाकचौरे, रमेश राक्षे, धनंजय संत, जालिंदर बोडके, योगेश जाधव यांनीही मुक्काम करीत शिवार संवाद साधला.पालकमंत्र्यांच्या या दौर्‍यामुळे मवेशी ग्रामस्थांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

 

1 COMMENT

LEAVE A REPLY

*