शाडूच्या गणेशमूर्तींवरील जीएसटी 5 टक्क्यांवर!

0

गणेशभक्त, सार्वजनिक मंडळांना दिलासा

अहमदनगर (प्रतिनिधी) – जीएसटीचा फटका आपल्या लाडक्या बाप्पालाही बसला होता. कारण शाडूच्या गणेश मूर्तीवर तब्बल 28 टक्के जीएसटी लावण्यात आला होता. हा टॅक्स कमी करावा अशी मागणी राज्यातील अनेक खासदारांनी केली होती. त्यासाठी पाठपुरावा करून हा टॅक्स 28 वरुन 5 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात त्यांना यश मिळाले आहे. देशभरात मूर्तीकारांना याचा फायदा होणार आहे.

गणेश उत्सव हा आनंदाचा उत्सव असतो. दरवर्षी या उत्सवाची आपण आतुरतेने वाट पहात असतो. गणेशमूर्तीना महागाईचा फटका तर दरवर्षी बसतोच. मात्र, यावर्षी गणेशमूर्तींना जीएसटीचा फटका बसला होता. केवळ नगर जिल्ह्यातच नव्हे तर देशभरात तयार होणार्‍या शाडूच्या घरगुती गणपतीच्या मूर्तींवर तब्बल 28 टक्के जीएसटी लावण्यात आला होता. हा टॅक्स रद्द करावा यासाठी खासदारांनी लोकसभेत आवाज उठवला होता. काल दिल्ली इथं झालेल्या जीएसटी कौन्सिलच्या मिटिंगमध्ये शाडूच्या गणेशमूर्तींवरील 28 टक्के जीएसटी हा कमी करुन तो 5 टक्के करण्यात आला आहे.

जिल्ह्यात नगर, श्रीरामपूर, संगमनेर येथे हजारो शाडूच्या गणेश मूर्ती तयार केल्या जातात. तर महाराष्ट्र आणि देशात या आकडा किती होईल, याचा अंदाज यावरुन येईल. जीएसटीमुळे घरगुती शाडूच्या गणेश मूर्तींवरील दरामध्ये अधिक 280 ते 300 रुपयांचा फरक पडणार होता. त्यामुळे सामान्य गणेशभक्त आणि मूर्तीकारही नाराज होते.
गणेश उत्सव हा सावर्जनिक उत्सव असून त्यावरील संपूर्ण जीएसटी रद्द व्हावा, अशी मागणीही होत आहे. मात्र तुर्त तरी शाडूच्या गणेश मूर्तींवरील जीएसटी कमी झाल्याने समाधान व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

*