ग्रामसेभेतील अरेरावी आजी-माजी सरपंच यांना पडली महागात

jalgaon-digital
2 Min Read

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

ग्रामसभेत अरेरावी आणि शिवीगाळ करणे पारनेर तालुक्यातील जवळे येथील आजी-माजी सरपंच यांना भारी पडले आहे. यामुळे त्यांच्या विरोधात पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

जवळे येथे नुकत्याच पार पडलेल्या ग्रामसभेत ग्रामस्थांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना सत्ताधार्‍यांचा तोल सुटल्याने वाद होऊन ग्रामसभा अर्ध्यावर गुंडाळण्याची नामुष्की पदाधिकार्‍यांवर ओढवली होती. सभेतील गोंधळानंतर निम्म्याहून अधिक ग्रामस्थांसह पदाधिकार्‍यांनी यावेळी सामूहिक सभात्याग केला होता. मात्र, त्यानंतर काही मोजके ग्रामस्थ यांना हाताशी धरून जवळ्यात चार दिवसांपूर्वी ग्रामस्थांनी भरवलेल्या प्रति ग्रामभेला उत्तर देणे सत्ताधिकार्‍यांनी सुरू ठेवले. यावेळी प्रति ग्रामसभा भरवणारे व त्यांचे पाठीराखे कोण होते त्यांच्याकडे पाहून घेतो, म्हणत प्रति ग्रामसभा भरवण्यासाठी पुढाकार घेणारे रामदास घावटे यांना यावेळी शिवीगाळ व अपशद्ब वापरण्यात आले. यावेळी या सभेचे फेसबूकवर थेट प्रक्षेपण सुरू होते.

दरम्यान घावटे यांनी जवळे गावचा विकास आराखडा तयार करून प्रति ग्रामसभेसमोर ठेवला होता. तसेच सामाजिक हिताचे काही निर्णय घेण्यास ग्रामसभेला सुचवले होते. यावरून मात्र, सत्ताधारी चांगलेच आक्रमक झाले होते. या गावात काय करायचे काय नाही ते आम्हीच ठरवणार असे म्हणत ग्रामस्थांच्या मागण्यांचा विचार न करता अरेरावी करत भर ग्रामसभेत गोंधळ घालत मनमानी केली होती.

ही बाब मोठ्या प्रमाणात समाज माध्यमावर पसरल्यामुळे चांगल्या सूचना ग्रामसभेत सुचवणार्‍यांचा आवाज दडपल्याप्रकरणी व भावना दुखावल्यामुळे ग्रामसभेत दडपशाही करणारे माजी सरपंच सुभाष भाऊसाहेब आढाव, तंटामुक्ती अध्यक्ष, चेअरमन व माजी सरपंच शिवाजी धोंडीबा सालके, उपसरपंच गोरख शिवाजी पठारे या आजी-माजी सरपंचा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पारनेर पोलिसांकडे याबाबत गुन्हा दाखल करण्याची मागणी करणारे निवेदन भाऊसाहेब खेडेकर, बबनराव कवाद, भानुदास साळवे, सुनील चौधरी, दत्ता जाधव यांनी दिले होते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *