आमदार आदर्शगाव भामाठाणच्या ग्रामसभेत खडाजंगी

0

मागील ग्रामसभेच्या ठरावांची अंमलबजावणी न झाल्याने ग्रामस्थांनी मागितला खुलासा

भामाठाण (वार्ताहर) – श्रीरामपूर तालुक्यातील भामाठाण हे गाव आमदार आदर्श गाव योजनेत सहभागी आहे. नुकत्याच झालेल्या ग्रामसभेमध्ये ग्रामस्थांनी मागील झालेल्या ग्रामसभेतील मंजूर ठरावांतील एकाचीसुद्धा अंमलबजावणी झाली नसल्याबद्दल खुलासा मागितल्याने चांगलाच गोंधळ झाला. संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी जर अंमलबजावणी करायची नसेल तर ठराव करताच कशाला असे सुनावले. भामाठाण ग्रामसभेत एक ठराव ग्रामस्थ मांडतात मात्र, ग्रामपंचायात प्रत्यक्षात प्रोसडिंगवर दुसरेच ठराव लिहून घेतात. या कारणावरून ग्रामसभेमध्ये चांगलीच खडाजंगी झाली.

स्वातंत्र्यदिनी झालेल्या ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी पोलीस पाटील मधुकर बनसोडे होते. प्रारंभी ग्रामसेवक आसने यांनी ग्रामस्थांना स्वच्छ भारत अभियानाची शपथ दिली. मंजूर घरकुले लाभार्थी यांच्या नावे जमीन नसल्याकारणाने मागे जाण्याची वेळ निर्माण झाल्याने यावेळी लाभार्थ्यांनी अधिकारी व पदाधिकारी यांचा चांगलाच समाचार घेत ग्रामपंचायतच्या गावठाण जागेत घरकुल बांधण्यासाठी आवश्यक मंजुरी द्यावी, अशी मागणी केली. मागील ग्रामसभेत राहिलेले ‘पाणी फिल्टर’ बसवण्याची मागणी तरुणांनी करत जोरदार घोषणाबाजी केली.

भामाठाण-घुमनदेव रस्ता व पूल करण्याची मागणी तेथील रहिवाशांनी केली. 14 व्या वित्त आयोगाचा हिशोब विचारण्यात आला, परंतु त्या बद्दल काहीच उत्तर ग्रामपंचायत देऊ शकली नाही. पिण्याच्या पाण्याची टंचाई गावात निर्माण झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. यावर वीजपुरवठा कमी दाबाने होत असल्याने पाणीपुरवठा करताना अडचणी येत असल्याचे सांगण्यात आले. यामुळे ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा योजनेच्या ट्रान्स्फार्मरवरील इतर वीजजोडण्या काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. गावातील वाळूउपसा त्वरित बंद करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली. ग्रामरक्षक दल स्थापन करण्यात आले.

आमदार आदर्श गाव योजनेत सहभाग घेऊन बरेच दिवस झाले व मोठा निधी प्राप्त झाला आहे. प्रत्यक्षात काहीच कामे झाली नसून विकास होत नसल्याने ग्रामस्थांची मोठी नाराजी आहे. त्याचे प्रतिबिंब ग्रामसभेत उमटले. याप्रसंगी सरपंच, उपसरपंच, अंगणवाडी सेविका, तलाठी हिवाळे, संपर्क अधिकारी यांच्यासह मोठ्या प्रमाणावर तरुण, महिला व अन्य ग्रामस्थांची उपस्थिती लक्षणीय होती.

ग्रामरोजगार सेवक म्हणून माझे काम पाच वर्षांपासून चांगल्या प्रकारे चालू असताना उपसरपंच सध्या प्रत्येक ग्रामसभेत माझा मुद्दा उपस्थित करून जाणीवपूर्वक त्रास देण्याचे काम करीत आहेत. त्यांचा ग्रामपंचायत मध्ये मनमानी कारभार आहे. त्याचप्रमाणे ग्रामरोजगार सेवकाने आपण सांगू त्याचप्रमाणे काम करावे असे त्यांची व्यक्तिगत इच्छा असून त्यास माझा विरोध आहे. सामाजिक वनीकरण विभागामार्फत चालू असलेले रस्ता-दुतर्फा वृक्ष लागवड या कामात वारंवार उपसरपंच हस्तक्षेप करीत असून कामावर असलेल्या मजुरांना माझ्या बद्दल तक्रार करा नाहीतर तुम्हाला कामावरून काढून टाकीन अशी धमकीवजा इशारा देतात. त्यामुळे प्रत्येक ग्रामसभेत माझा मुद्दा उपस्थित करून नवीन रोजगार सेवक घेण्याची ते मागणी करतात.व्यक्तिगत रोषापोटी असे होत असल्याची प्रतिक्रिया ग्रामरोजगार सेवकाने दिली.

ग्रामरोजगार सेवक व उपसरपंच यांच्यात खडाजंगी –
उपसरपंचांनी ग्रामरोजगार सेवक नवीन घेण्याची सूचना मांडली. यावर ग्रामरोजगार सेवकाने त्याचे कारण विचारले असता लेखी कुठलीही तक्रार नसताना हा मुद्दा उपसरपंच यांनी मांडला. यावेळी दोघांत चांगलीच खडाजंगी झाल्याने ग्रामस्थांनी यांच्या दोन्हीतील व्यक्तिगत वाद ग्रामसभेत काढल्याने नाराजी व्यक्त करून ग्रामसभेचा वेळ वाया न घालण्याची विनंती केली.

LEAVE A REPLY

*