पाचेगाव ग्रामसभेत वाळू प्रश्‍नावरुन हमरीतुमरी

0

पाचेगाव (वार्ताहर)- नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथे स्वातंत्र्यदिनी झालेल्या ग्रामसभेत वाळू प्रश्‍नावरून गदारोळ झाला. वाळूचा प्रश्‍न इतका चिघळला की सत्ताधारी आणि विरोधक, गावकरी यांच्यात हमरीतुमरी झाली व त्यातच ग्रामसभा विसर्जीत झाली.

मागील सभेचे विषय कायम करून सभेला सुरुवात करण्यात आली. अपंग निधी, दलित वस्ती विकासनिधी, चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीतून मंजूर झालेली कामे, मासिक जमाखर्च फलकावर लावणे, निर्मलग्राम, शौचालय, आरोग्य, रस्ते, पाणी प्रश्‍न, लाख कालवा, शिक्षण तसेच तंटामुक्ती समिती स्थापना करणे आदी विषयावर सविस्तर चर्चा होणे अपेक्षित होते परंतु या विषयावर कोणतीही चर्चा करण्यात आली नाही. ठोस असे निर्णय घेण्यात आले नाही.
गावातील महिलांनी दारुबंदीचा ठराव घ्यावा असे सूचित केले.ग्रामसभेत पहिल्यांदा प्रोसिडिंगवर गावकर्‍याच्या सह्या घेण्याचा प्रयत्न झाला. यापूर्वी सह्या वहीच्या कागदावर घेण्यात येत होत्या.

त्यानंतर मागील सभेतील वाळू प्रश्‍नावरून गदारोळास सुरुवात झाली.वाळूचा प्रश्‍न इतका चिघळला की सत्ताधिकारी आणि विरोधक, गावकरी यांच्यात हमरीतुमरी झाली. त्यातच सभा विसर्जीत झाली. त्यामुळे नवीन विकास योजनांबाबत या गदारोळामुळे चर्चा झाली नाही अशी ग्रामस्थात चर्चा सुरु होती.

या घटनेने युवकांनी काय आदर्श घ्यावा? असा प्रश्‍न नक्कीच पडला असणार. पाचेगांव ग्रामपंचायत निवडणूक काही दिवसावर येवून ठेपली असताना ग्रामस्थांच्या प्रश्‍नांची उत्तरे देताना सत्ताधार्‍याची दमछाक झालेली पहावयास मिळाली. आतापर्यंतच्या कार्यकाळात अशी ग्रामसभा पहावयास मिळाली नाही असे जुने जाणकार ग्रामस्थ बोलत होते. ग्रामविकास अधिकारी श्री. बनसोडे यांना ग्रामस्थांनी विचारलेल्या प्रश्‍नांची उत्तरे देता आली नाही.

तत्पूर्वी जिल्हा परिषद, प्राथमिक शाळा, पाचेगाव माध्यमिक शाळा, श्री समर्थ इंग्लिश मिडियम स्कूल, पाचेगाव ग्रामपंचायत, अहमदनगर जिल्हा बँक शाखा तसेच पाचेगाव सोसायटीसह अनेक ठिकाणी उत्साहपूर्ण वातावरणात ध्वजारोहण झाले.

LEAVE A REPLY

*