गावातील व्यसनाधीनतेला ग्रामरक्षक दल आळा घालणार

0

आमदारांच्या उपस्थितीत प्रशासनाच्या मदतीबाबत अनेकांनी व्यक्त केल्या शंका

श्रीरामपूर (प्रतिनिधी) – गावागावांत सध्या व्यसनांचे प्रमाण वाढत चालले असून त्याला आळा घालण्यासाठी शासनाने गावागावात ग्रामरक्षक दलाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यास प्रशासनाने सहकार्य करावे तसेच गावकर्‍यांनीही ही योजना यशस्वी करावी असे आवाहन आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी केले. यावेळी ग्रामरक्षक दलास प्रशासनाचे सहकार्य राहील की नाही याबाबत अनेकांनी आपल्या मनोगतातून शंका व्यक्त केल्या.
येथील प्रांताधिकारी कार्यालय तसेच तहसील कार्यालयाच्यावतीने प्रशासकीय इमारतीत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी आ. भाऊसाहेब कांबळे होते. यावेळी प्रांताधिकारी तेजस चव्हाण, तहसीलदार सुभाष दळवी, पंचायत समितीचे सभापती दीपक पटारे, उत्पादन शुल्कचे श्री. पोळ, पंचायत समिती सदस्या वंदना मुरकुटे, छाया कानडे, नायब तहसीलदार गुंजाळ, गटविकास अधिकारी जाधव, पोलीस निरीक्षक पथवे, पोलीस निरीक्षक संपतराव शिंदे, कृषी विभागाचे शिरसाठ, वडाळा उपविभाग पाटबंधारे खात्याचे खोसे आदी अधिकारी उपस्थित होते.
आ. कांबळे म्हणाले, नागरिकांचा सहभाग जोपर्यंत राहणार नाही तापर्यंत शंभर टक्के दारुबंदी होऊच शकणार नाही. केवळ नागरिकांचेच नाही तर प्रशासनानेही यासाठी सज्ज झाले पाहिजे. यात कोणतेही राजकारण न करता हा विषय हातळला गेला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
सभापती दीपक पटारे म्हणाले, शासनाने राबविलेली ही योजना खूपच चांगली आहे. त्यासाठी आपल्या सर्वांनाच पुढाकार घ्यावा लागणार आहे. गावात दारुचे अड्डे होऊ नये म्हणून ग्रामस्थांनीच कडक भूमिका घेतली तर आपले गाव 100 टक्के दारूमुक्त होऊ शकेल.
प्रांताधिकारी तेजस चव्हाण म्हणाले, प्रत्येक ठिकाणी दारुबंदी होऊन वाढत्या व्यसनांना आळा घालणे गरजेचे आहे. त्यासाठी नागरिकांचा सहभाग महत्वाचा आहे. म्हणून शासनाने प्रत्येक गावात ग्रामरक्षक दलाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे, त्यासाठी प्रशासनाचे संपूर्ण सहकार्य राहील त्यामुळे महिलांनीही यात मोठा सहभाग घेतला तर ही योजना यशस्वी होऊ शकेल.
तहसीलदार सुभाष दळवी म्हणाले, शासनाने राबविलेली ही मोहीम यशस्वी करण्यासाठी शासन स्तरावर आमचे संपूर्ण सहकार्य या ग्रामरक्षक दलास राहणार आहे. काही अडचणी किंवा तक्रारी आल्यास त्या आम्ही सोडवू, या ग्रामरक्षक दलात किमान 7 किंवा 11 सदस्य राहतील. या सदस्यांची निवड ही गावात होणार्‍या ग्रामसभेत केली जावी. ही समिती सर्वसंमतीने व्हावी, असेही त्यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले.
गावातील लोकांनी पुढाकार घेतला पाहिजे असे आमदारांनी सांगताच त्यावेळी नाऊरचे सोन्याबापू शिंदे म्हणाले, गावातील लोकांच्या मदतीसाठी कोणीच येत नाहीत, मानेवर चाकू ठेवले जातात त्यावेळी हे प्रशासन कोठे जाते? पोलिसांचेही सहकार्य नसते. यांचा झिरो पोलीस तर हप्ते घेण्यात मशगुल असतो. या वाळु तस्करी करणारे किंवा दारू बनविणार्‍या लोकांकडून आमच्याच जिवाला धोका असतो. आमचीच सुरक्षा टांगणीला आहे आम्ही कोणाची सुरक्षा करणार? वाळू तस्करांकडून सरळसरळ अधिकार्‍यांना पाकिटे पुरविले जात असतील तर अधिकारी काय कारवाई करणार? असा प्रश्‍नावर प्रश्‍न व तळतळून श्री. शिंदे बोलत असताना पोलीस निरीक्षक श्री. शिंदे व श्री. पथवे हे गुपचुप ऐकून घेत होते. पोलिसांची खरीच खूपच वाईट परिस्थिती या भागात असल्याचेही या भागातील नागरिकांनी बोलून दाखविले. आमची साधी तक्रार हे लोक ऐकून घेत नाहीत, त्यामुळे हे लोक काय आमची सुरक्षा करणार? असा सवालही त्यांनी व्यक्त केला. परंतु काही चांगले अधिकारी असल्याचे खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष पिसे यांनी सांगितले. सोन्याबापू शिंदे यांनी सांगितलेली सर्व परिस्थिती सत्य आणि खरी आहे. मागील काळात या भागातील लोकांनी किती त्रास सहन केला. गुंडांच्या तावडीतून आपला जीव वाचविला असल्याचे सांगितल्याने अनेकांनी टाळ्याही वाजविल्या.

LEAVE A REPLY

*