शासकीय योजना शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवा : आ. मुरकुटे

0

पंचायत समितीतील आढावा बैठकीत अधिकारी व कर्मचार्‍यांना सूचना

नेवासा (तालुका प्रतिनिधी) – नेवासा पंचायत समिती आढावा बैठकीत आमदार मुरकुटे यांनी तालुक्याच्या विकास कामांमध्ये पंचायत समिती अधिकारी व कर्मचार्‍यांनी प्रत्येक शासकीय योजनेचा लाभ शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवावा अशा सूचना केल्या.

पंचायत समिती निवडणुकीनंतर प्रथमच पंचायत समितीमध्ये आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी आढावा बैठक घेतली. आढावा बैठकीमध्ये सर्वच विभागांचे माहिती घेतली. प्रत्येक विभागवार अधिकार्‍यांना स्पष्ट सूचना दिल्या. बैठकीला जिल्हा परिषद उपमुख्याधिकारी श्री. शिर्के, गटविकास अधिकारी सुधाकर मुंढे, उपगटविकास अधिकारी अनंत परदेशी, भाजप तालुकाध्यक्ष ज्ञानेश्‍वर पेचे, दत्तात्रय बर्डे व सर्व नगरसेवक तसेच प्रशासकीय अधिकारी हजर होते.

कृषी विभागामध्ये कृषी विषयक साहित्याचे वाटप तसेच अनुदानाच्या वाटपामध्ये ग्रामपंचायत स्तरावर ग्रामसेवकांनी लाभार्थ्यांना माहिती द्यावी. कारण, प्रत्येक नागरिक पंचायत समितीपर्यंत येऊ शकणार नाही. तो ग्रामपंचायत कार्यालयात जाऊ शकतो असे विचार मांडले. गावातील सरकारी जागेवरील अतिक्रमणाचा अहवाल ग्रामसेवकांनी त्वरित द्यावा. तसेच पाऊस आला नाही तर टंचाई आराखडे त्वरित तयार करावेत अशा सूचना त्यांनी दिल्या.

समाज कल्याण विभागामध्ये मागील सदस्यांच्या साहित्याचा वाटप आढावा घेतला व शासनाकडून येणार्‍या साहित्याचे पारदर्शीपणे वाटप व्हावे अशा सूचना केल्या. प्रत्येक गावात वीज वितरणासाठी ग्रामपंचायत मार्फत एक वीजतंत्री माणूस नेमावा हा नियम आहे. तालुक्यात अद्याप कुठेही तसे झालेले नाही. शैक्षणिक विभागाविषयी पालकांच्या तक्रारी थेट आमदारापर्यंत येतात. त्या येऊ नयेत म्हणून प्रत्येक शाळेमध्ये शिक्षक-पालक संघाच्या बैठका प्रत्येक महिन्यात कागदोपत्री न घेता प्रत्यक्ष घ्याव्यात. तसेच सेमीच्या विषयामध्ये पालकांना योग्य मार्गदर्शन करावे.

शिक्षकांच्या कामकाजावर अधिकार्‍यांनी लक्ष ठेवावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार 2022 पर्यंत सर्वांना घरे मिळावीत यासाठी शासन स्तरावर घरकुलांच्या विविध योजना आहेत. त्या प्रत्यक्ष राबविताना तालुक्यात कोणीही वंचित राहणार नाही याची अधिकार्‍यांनी दक्षता घ्यावी. सरकारी रुग्णालयाच्या प्रत्येक वैद्यकीय अधिकार्‍याने नेमलेल्या ठिकाणी पूर्ण वेळ थांबून सेवा द्यावी. पावसाळ्यातील साथीच्या रोगांकडे लक्ष ठेवावे. तसेच पंचायत समितीला अनेक वेळा निवेदन देऊनही अपंगासाठीचा 3 टक्के निधी खर्च करण्यावर नियोजन नसल्याने संघटनेमार्फत उपोषणे होत असल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

*