४ जूनपासून गोदावरी स्वच्छता मोहीम चालणार वर्षभर

एनजीओच्या मदतीतून स्वच्छतेबरोबर कचरा विलगीकरणाची मोहीम

0
नाशिक | दि.२५ प्रतिनिधी- नाशिक महापालिकेच्या वतीने येत्या ४ जून या पर्यावरण दिनापासून वर्षभर शहरातील एनजीओ यांच्या मदतीने गोदावरी नदी, नदीला जोडणार्‍या उपनद्या, नाले यांची स्वच्छता मोहीम राबवली जाणार आहे. तसेच शहरातील कचरा संकलनात कचरा विलगीकरणासंदर्भात जनजागृती केली जाणार असल्याची माहिती आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी दिली.

आज महापालिका मुख्यालयातील रेकॉर्ड रूम हॉलमध्ये शहरातील गोदावरी नदी, इतर नद्या, नाले यांच्या स्वच्छतेच्या मोहिमेसासाठी शहरातील सर्व सामाजिक संस्था, संघटना, मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. यात शहरातील ४० संस्थांचे ५८ प्रतिनिधी हजर होते. यात पर्यावरण दिनापासून घेण्यात येणार्‍या स्वच्छता मोहिमेसंदर्भात प्राथमिक चर्चा होऊन याची तयारी करण्यात आली.

यात अनेक कार्यकर्त्यांची मनोगते ऐकून घेण्यात आली. आता १ जून रोजी या एनजीओ कार्यकर्त्यांची पुन्हा बैठक घेतली जाणार आहे. बैठकीत झालेल्या चर्चेची माहिती देताना आयुक्त म्हणाले, जागतिक पर्यावरण दिनानिमित्त म्हणजे ४ जूनपासून गोदावरी नदी स्वच्छता मोहीम ही जनसहभागातून घेतली जाणार आहे.

यात शहरातील सर्वच एनजीओ, नागरिकांचा सहभाग राहणार आहे. ही मोहीम पुढे वर्षभर चालवली जाणार असून यात गोदावरीबरोबर शहरातील इतर नद्या, नाले या ठिकाणीदेखील टप्प्याटप्प्याने स्वच्छता केली जाणार आहे. याचबरोबर शहरात कचरा संकलन करताना नागरिकांनी ओला व सुका कचरा विलगीकरण करून तो घंटागाडीत टाकावा.

तसेच प्लॅस्टिक पिशवीचा वापर कमीत कमी करावा यासंदर्भात जनजागृती केली जाणार आहे. याच पाश्‍वर्भमूवर येत्या ५ जून रोजी पंचवटीतील प्रभाग ४ मधील संजयनगरमध्ये पालकमंत्री, आमदार, महापौर, नगरसेवक व लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत कचरा विलगीकरण करण्याबाबत नागरिकांकडून सामूहिक शपथ घेतली जाणार आहे.

अशाप्रकारे नागरिकांत कचरा विलगीकरण व प्लॅस्टिक पिशवी वापरावर निर्बंध यासंदर्भात जनजागृतीचे काम पुढील काळात केले जाणार असल्याचेही आयुक्तांनी सांगितले.

ऑगस्टअखेर कचरा विलगीकरण होणार
महापालिकेच्या २०० पैकी केवळ ४२ घंटागाड्यांत कचरा विलगीकरण केले जात असून या ठिकाणी नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता हळूहळू सर्व विभागांत नागरिकांत जनजागृती करून घंटागाडीत ओला व सुका कचरा स्वतंत्रपणे टाकला जाईल याकडे लक्ष देण्यात येणार आहे. येत्या ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस सर्व घंटागाड्यांत कचर्‍याचे विलगीकरण शंभर टक्के पूर्ण होईल, असे लक्ष्य संबंधितांना देण्यात आल्याची माहिती आयुक्तांनी दिली.

LEAVE A REPLY

*