घरबसल्या संगणकीकृत सात-बारा मिळणार

0

संगणकीकृत सॉफ्टवेअर विकसीत

श्रीरामपूर (प्रतिनिधी) – श्रीरामपूर तालुक्यातील नागरिकांना आता घरबसल्या संगणकीकृत सात बारा पहाता येऊ शकणार आहे.
सदरची माहिती नागरिकांना कळावी म्हणून 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या दरम्यान 15 दिवस वेगवेगळे कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती प्रांताधिकारी तेजस चव्हाण, व तहसीलदार सुभाष दळवी यांनी दिली.
याबाबत तहसील कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. यावेळी नायब तहसीलदार श्रीमती गुंजाळ, तालुक्यातील तलाठी, मंडलाधिकारी उपस्थित होते.
सदरचे संगणकीकृत सॉफ्टवेअर विकसीत झाल्यामुळे मोबाईलवर किंवा संगणकावर नागरिकांना घरबसल्या डिजिलाइज्ड सातबारा उपलब्ध होणार आहे त्यामुळे नागरिकांची खूप मोठी बचत होणार असल्याचेही ते म्हणाले.
राज्य शासनाने हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. शासनाचे संगणकीकृतचे काम 2003 पासून सुरू आहे. यामध्ये बरेचसे बदल होत गेले त्या बदलानुसार या संगणकीकृत दाखल्यांमध्ये बदल करण्यात आले. हा दाखला हस्तलिखित दाखल्यासारखाच असणार आहे.
यासाठी एनआयसी या संस्थेचा महत्त्वाचा सहभाग आहे. अशा प्रकारची प्रत्येक जिल्ह्यात एक शाखा राहणार आहे. यात तांत्रिक काही बिघाड झाल्यास काही अडचण आल्यास ही संस्था मदत करणार आहे. तसेच तलाठ्यांना तसेच अधिकारी कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देण्याचे कामही केले.
तालुक्यात एकूण 41506 सातबारा असून यापैकी 38511 सातबारा तपासून ते बरोबर केले आणि तर 2995 सात बारामध्ये काही तांत्रिक चुका असल्यामुळे ते दुरुस्त करण्यात येणार आहेत. यात उक्कलगाव 1264, श्रीरामपूर 619, तर शिरसगावमध्ये 511 सातबारा आहेत. हे काम अंतिम टप्प्यात आले आहे.
आपल्या कार्यक्षेत्रात संगणकीकृत सातबारा उतार्‍याबाबत नागरिकांना माहिती देवून त्याचे महत्त्व पटवून देण्यात येणार आहे. साताबार दाखल्यात काही चुका असल्यास शासनाच्या या संकेत स्थळावरून पडताळणी करून तात्काळ संबंधित तलाठी किंवा तहसील कार्यालयात कळवावे, असेही आवाहन तहसीलदार श्री. दळवी यांनी केले.

LEAVE A REPLY

*