नाशिकच्या औद्योगिक विकासात पूर्ण योगदान – गिते

‘मेक इन नाशिक’ परिषदेचे मुंबईत शानदार उद्घाटन

0
मुंबई | दि ३० प्रतिनिधी – मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्याने महाराष्ट्राचा देशावर हक्क आहे. त्यामुळे उद्योग विकासात राज्याला संपूर्ण सहकार्य करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. राज्याचा विकास करताना पुणे व औरंगाबाद ‘ऑटो हब’ झाले आहे. जगभरातील वाहन उद्योग येथे स्थिरावले आहेत. नाशिकमध्ये सर्व सोयी-सुविधा उपलब्ध असतानाही नाशिकच्या विकासाला गती मिळालेली नाही.

नाशिकच्या औद्योगिक विकासात आपण पूर्ण योगदान देऊ, असे आश्‍वासन केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गिते यांनी दिले. भारतातील सर्वाधिक वेगाने विस्तारणार्‍या शहरांत समाविष्ट व ‘स्मार्ट सिटी’ बनण्याच्या तयारीत असणार्‍या नाशिक शहरात मोठमोठे उद्योग नव्याने यावेत, यासाटी उद्योगविश्वाला निमंत्रण देणार्‍या ‘मेक इन नाशिक’ या दोन दिवसीय परिषदेचे उद्घाटन आज मुंबईतील वरळीच्या नेहरु विज्ञान केंद्राच्या आलिशान सभागृहात केंद्रीयमंत्री गिते यांच्या हस्ते झाले. त्यावेळी गिते बोलत होते.
भारत सरकारच्या विविध मंत्रालयांचे २८३ सार्वजनिक उपक्रम तसेच भारत सरकरकडून चालवल्या जाणार्‍या २१ अवजड उद्योगांचा कारभार माझ्याकडे आहे. नाशिकला यातील कोणते उपक्रम व उद्योग आणायचेत याविषयी आपण दिल्लीत चर्चा करू. त्यासाठी नाशिकच्या उद्योजक संघटना पदाधिकार्‍यांनी दिल्लीत मंत्रालयात येऊन चर्चा करावी, असे आवाहन गिते यांनी केले.
गिते यांना दिल्लीला परत जायचे असल्याने उद्घाटन कार्यक्रमात सुरुवातीलाच त्यांनी भाषण केले व सभागृहाची परवानगी घेऊन ते निघून गेले. उद्घाटन समारंभाला मुख्यमत्र्यांसह अन्य मंत्रीही येणार होते. मात्र मंत्रिमंडळाच्या बैठकीमुळे उद्घाटन समारंभात ते सहभागी होऊ शकले नाहीत. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू देखील तब्बेतीच्या कारणामुळे येऊ शकले नाहीत.

त्यांच्या वतीने मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. सी. शर्मा उपस्थित होते. रेल्वेच्या विविध विकास योजनांमध्ये नाशिकचे स्थान कसे महत्वाचे आहे, ते शर्मा यांनी सांगितले. खासदार हेमंत गोडसे, आ.सुधीर तांबे, राहुल आहेर, देवयानी फरांदे यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. ‘मेक इन नाशिक’ उपक्रमाचे सर्वांनी कौतुक केले. यावेळी नाशिकच्या क्षमता व संधींसंदर्भात एक चित्रफितही दाखवण्यात आली. प्रास्ताविक निमाचे अध्यक्ष हरिशंकर बॅनर्जी यांनी केले.

आभार जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी मानले. उद्घाटन समारंभास महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष शंतनु भडकमकर, वरिष्ठ उपाध्यक्ष संतोष मंडलेचा, ‘नाईस’चे अध्यक्ष विक्रम सारडा, आयमा अध्यक्ष राजेंद्र अहिेरे, निवेकचे अध्यक्ष संदीप सोनार, क्रेडाईचे माजी अध्यक्ष जितुभाई ठक्कर व अनंत राजेगावकर, निपमचे श्रीधर व्यवहारे, धनंजय बेळे, आशिष नहार, नगरसेवक हिमगौरी आडके, योगेश हिरे, शशिकांत जाधव, अश्‍विनी बोरस्ते, भाजप नेते सुनील बागूल व लक्ष्मण सावजी, ताराचंद गुप्ता आदींसह उद्योग संघटनांचे पदाधिकारी आणि प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पाठपुरावा करणार
नाशिक महापालिकेकडून ‘मेक इन नाशिक’अंतर्गत उद्योगवाढीसाठी आवश्यक ते प्रयत्न केले जातील. त्याचा पाठपुरावा करण्यासाठी जागा तसेच आवश्यक सोयी-सुविधा पुरवण्यासाठी महापालिका प्रयत्नशील आहे. महापौर या नात्याने मी स्वतः याकामी लक्ष पुरवणारआहे.
– महापौर रंजना भानसी

उपक्रम कौतुकास्पद
नाशिकचे ब्रँडिंग करण्याचा हा निमा, क्रेडाई तसेच अन्य उद्योजक संघटनांचा उपक्रम कौतुकास्पद आहे. दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडरच्या पहिल्या टप्प्यात नाशिकचा समावेश न होता औरंगाबादचा झाला याची खंत आहे. निदान दुसर्‍या टप्प्यात नशिक नक्की येईल. कारण आता नाशिकला अधिक पाण्याची व्यवस्थाही झाली आहे. वाईन उत्पादनात नाशिक अग्रेसर आहे. येथे वाईन बोर्डाची निर्मिती करावी. रेल्वे प्रकल्पासाठी दंडवते मंत्री होते तेंव्हाच शंभर एकर जागा राखीव होती. मात्र नंतर रेल्वेचा प्रकल्प येथे आला नाही. तो आता यावा.
-खा. हेमंत गोडस

नव्या उद्योगांचे स्वागत
नाशिकची हवा उत्तम आहे. येथे संपर्काची साधने चांगली आहेत, असे आयोजकांनी सांगितले ते खरेच आहे, पण नाशिकची माणसेही चांगली आहेत. ही माणसे नव्या उद्योगांचे स्वागत करण्यासाटी उत्सूक आहेत. ‘मेक इन…’ घेणारे नाशिक पहिले शहर आहे.
– आ. देवयानी फरांदे

बाहेरील उद्योग आकर्षित करा
‘मेक इन नाशिक’ संकल्पनेची जबाबदारी घेतल्याबद्दल ‘निमा’चे आभार. ‘मेक इन नाशिक’ हा उपक्रम नाशिककरांनी नाशिककरांसाठी केलेला उपक्रम असे स्वरुप असू नये. बाहेरील उद्योग आणि उद्योजकांना अधिक प्रमाणात आकर्षित करण्याचा प्रयत्न यातून व्हावा. नाशिकमध्ये उद्योगवाढीसाठी पोषक वातावरण आहे. येणार्‍या काळात शहरासह जिल्ह्यात औद्योगिक वसाहतींमध्ये वाढ होणार आहे.
– आ. डॉ.राहुल आहेर

LEAVE A REPLY

*