आजपासून ‘मिशन इंदधनुष्य’

0
नाशिक | दि. ६ प्रतिनिधी- बालकांना लसीकरणाने संरक्षित करण्यासाठी आरोग्य विभागातर्फे ‘मिशन इंद्रधनुष्य’चे तिसरे सत्र जिल्ह्यात दि. ७ ते १५ जून या कालावधीत राबवण्यात येणार आहे. बालकांमधील मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी लसीकरण महत्त्वाचे आहे. लसीकरण न झालेल्या गरोदर माता व पूर्ण लसीकरण न झालेल्या बालकांचे या उपक्रमांतर्गत लसीकरण करण्यात येते.

यात घटसर्प, गोवर, धनुर्वात या रोगांचा मागील दोन वर्षांत उद्रेक झालेला भाग, नियमित लसीकरणाचे काम कमी असणारा भाग, पल्स पोलिओतील जोखीम भाग, वीटभट्टी कामगार, ऊसतोड कामगार, अतिदुर्गम भाग, डोंगराळ भाग, सलग तीन वर्षे लसीरकण रद्द झालेली गावे, आरोग्य सेविका पद रिक्त असलेल्या उपकेंद्रांची गावे, शहरी भागातील झोपडपट्टी, स्थलांतरीत वस्त्या आदी ठिकाणी लक्ष केंद्रित केले जाते.

सर्वांनी या उपक्रमात सहभाग घेऊन एकही बालक आणि माता लसीकरणापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुशील वाकचौरे आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुरेश जगदाळे यांनी केले आहे. जागतिक आरोग्य संघटना आणि महाराष्ट्र शासनाचा आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील ९ जिल्ह्यांत आणि १९ महानगरपालिका क्षेत्रात हे अभियान राबवले जात आहे.

चौथ्या टप्प्यातील तिसर्‍या सत्रासाठी जिल्ह्यात २१० ठिकाणी लसीकरण सत्र आयोजित केले आहे. साधारण ९१८ लाभार्थी बालकांना या कालावधीत लसीकरण करण्यात येणार आहे. मोहिमेचे अखेरचे सत्र ७ जुलैपासून राबवण्यात येणार आहे.

मोबाईलची चोरी
नाशिक | रमजानची खरेदी करत असताना खिशातील मोबाईलवर चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना दूध बाजारात घडली. या प्रकरणी वडाळारोड परिसरातील रहिवासी जाकिर रंगरेज यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. रंगरेज हे रमजान उपवासाचे साहित्य खरेदी करत असताना चोरट्यांनी त्यांचा सात हजार ३०० रुपये किमतीचा मोबाइल लंपास केला.़

LEAVE A REPLY

*