शेवगाव गोळीबारप्रकरणी अहवालानुसार कारवाई

0

पालकमंत्री राम शिंदे यांची माहिती

अहमदनगर (प्रतिनिधी) – शेवगाव तालुक्यातील खानापूर येथे शेतकरी आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेल्या गोळीबार प्रकरणाची उपविभागीय दंडाधिकार्‍यांमार्फत चौकशी सुरू आहे. चौकशीचा अहवाल आल्यानंतर कारवाईबाबत निर्णय घेण्यात येईल, असे पालकमंत्री राम शिंदे यांनी सांगितले.

सहा दिवसांपूर्वी शेवगाव तालुक्यातील खानापूर येथे ऊस दराप्रकरणी झालेल्या आंदोलनामध्ये गोळीबारात जखमी झालेल्या दोघा शेतकर्‍यांची शिंदे यांनी सोमवारी येथील खासगी रुग्णालयात भेट घेऊन विचारपूस केली. महिनाभरापूर्वी आपण जलयुक्त शिवार योजनेबाबत राज्याच्या दौरा आखला होता. त्यामुळे जखमी शेतकर्‍यांची भेट घेता आली नाही. मात्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी जखमींची भेट घेतली होती आणि मदतीची घोषणाही केली होती.

गोळीबारात जखमी झालेले दोघे शेतकरी हे औरंगाबाद जिल्ह्यातील असल्याने तेथील जिल्हाधिकार्‍यांमार्फत त्यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदतीचा धनादेश देण्यात येणार आहे. खानापूर येथील आंदोलन ही मोठी घटना आहे. या ठिकाणी ऊस दरावरून शेतकरी आणि कारखाना व्यवस्थापन यांनी टोकाची भूमिका घेतली. दोन्ही बाजून अडून बसल्याने हा प्रकार घडला. राज्य सरकार शेतकर्‍यांना एफआरपी प्रमाणे दर देण्यास कटीबध्द आहे.

पालकमंत्र्यांनी भेट घेतलेल्या जखमी शेतकरी उद्धव मापारी यांनी आंदोलना दरम्यान शेतकर्‍यांवर दाखल गुन्हे मागे घेण्याची विनंती केली. त्यावर पालकमंत्री शिंदे यांनी सकारात्मक उत्तर देत काळजी घेण्याचे सांगितले. यावेळी पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, प्रभारी जिल्हाधिकारी विश्वजित माने, प्रादेशिक सहसंचालक (साखर) संगीता डोंगरे आदी उपस्थित होते.

गुरूवारी सहकार मंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक – 
खासगी साखर कारखाने आणि शेतकर्‍यांमध्ये समन्वय राखने ही सरकारचीच जबाबदारी आहे. याच दृष्टिकोणातून 23 नोव्हेंबर रोजी नगर विभागातील नगर आणि नाशिक जिल्ह्यातील साखर कारखाने व शेतकर्‍यांची समन्वय बैठक बोलावण्यात आलेली आहे. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या उपस्थित ही बैठक होणार आहे. यामध्ये ऊसउत्पादकांचे प्रश्न समजून घेण्यात येणार आहेत.

LEAVE A REPLY

*