लोणी पोलिसांची श्रीरामपूरच्या लुटारूंशी चकमक

0

गोळीबारात दोन लुटारू जखमी, दुचाकी अंगावर घातल्याने पोलिस जखमी

पिंपरी निर्मळनजीक शेतात दोघांना पकडले
श्रीरामपूरचे तिघे तर अशोकनगरचा एकजण गजाआड, दोघे पसार
लोणी हद्दीत तीन टेम्पो चालकांना लुटले, खंडाळ्यातील दोघांचा समावे
दत्तनगरलाही मारहाण करून घरातील ऐवज चोरला

लोणी (वार्ताहर)- श्रीरामपूर-बाभळेश्वर-लोणी रस्त्यावर सोमवारी मध्यरात्री टेम्पो चालकांना लुटणार्‍या दरोडेखोरांच्या टोळीचा लोणी पोलिसांशी सोमवारी मध्यरात्री सामना झाला. दोन्हीकडून गोळीबार झाला. अखेर चार दरोडेखोरांना पकडण्यात पोलिसांना यश आले तर चौेघे पसार झाले. सर्व आरोपी श्रीरामपूर परिसरातील असून पोलिसांशी झालेल्या झटापटीत जखमी झालेल्या दोन आरोपींवर प्रवरा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. श्रीरामपूर व लोणी पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध दरोड्याचा चार गुन्ह्यांसह एकूण पाच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सोमवारी मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास लोणीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांना लोणी-बाभळेश्वर रस्त्यावर वाहनांना लुटण्याचा प्रकार सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यांनी पोलीस कर्मचारी तसेच राजुरी, ममदापूर ग्रामस्थांच्या मदतीने नाकाबंदी केली. या रस्त्यावर आयशर टेंपो (क्र. एम.एच. 15 इ.जी. 5393) व छोटा हत्ती (क्र. एम.एच. 17 बी.डी. 2229) अडवून चालकांना कत्तीने मारहाण केल्याचा व त्यांच्याकडून एटीएम कार्ड, रोख रक्कम, मोबाईल काढून घेतल्याची घटना घडली होती.
पोलिसांनी लुटारूंचा पाठलाग करीत असताना लुटारूंनी गावठी कट्टयातून गोळीबार केला. पोलिसांवर हल्लाही केला. दुचाकी अंगावर घालून एका पोलीस कर्मचार्‍याला जखमी केले. स्वसंरक्षणसाठी पोलिसांनी फायरिंग केले. चार लुटारू बाभळेश्वरहून निर्मळ पिंपरी रस्त्याने जात असताना पोलिसांनी पाठलाग करून त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता दुचाकी सोडून ते शेतात पळाले. पोलिसांनी डाळींबाच्या शेतात दोघांना पकडले तर दोन जण उसाच्या शेतातून पसार झाले. दोघेजण अगोदरच पसार झाले होते.
पोलिसांनी तौफिक सत्तार शेख वय 31 रा. वॉर्ड क्र.1 श्रीरामपूर, राहुल विलास शेंडगे, वय 19 रा.अशोकनगर या जखमी आरोपींना पकडले. तर त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीवरून गौरव रवींद्र बागुल व किरण सुरेश काकफळे, दोघेही रा. श्रीरामपूर यांना शिताफीने अटक केली. दोन जणांच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत. पकडलेल्या आरोपीनी दिलेल्या माहितीनुसार ते रविवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास दत्तनगर येथील संतोष पवार यांच्या घराजवळ गांजा पीत बसले होते.
पवार यांनी त्यास हरकत घेतली म्हणून या आरोपीनी पवार कुटुंबियांना घरात घुसून काठी व कत्तीच्या साह्याने मारहाण करून त्यांच्या घरातील टी.व्ही., दागिने व रोख रक्कम चोरून नेली. त्यानंतर ते दुचाकीवरून बाभळेश्वर-लोणी रस्त्याने रास्ता लुटीसाठी आले होते. लोणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन टेम्पो लुटल्याने याठिकाणी दरोड्याचे तीन तर दत्तनगरच्या घटनेने श्रीरामपूर पोलीस ठाण्यात दरोड्याचा एक असे दरोड्याचे चार गुन्हे दाखल झाले आहेत.
पोलिसांवर हल्ला करून गोळीबार केल्याप्रकरणी जीवे मारण्याचा आणखी एक गुन्हा लोणी पोलिसांनी दाखल केला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर पाटील, गुन्हे अन्वेषण विभागाचे दिलीप पवार यांनी घटना स्थळाला भेट देऊन माहिती घेत सूचना दिल्या. पोलिसांनी एक पल्सर दुचाकी, दोन सत्तूर, एक टॉमी आरोपींकडून जप्त केली आहे. लोणी पोलीस ठाण्यात गु.र.नं. 124, 125, 126, 127 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

LEAVE A REPLY

*