अखेर शिवनेरीला निरोप; शिवाशाही करणार 24 फेर्‍या पूर्ण

0
नाशिक । गेल्या काही वर्षांपासून नाशिक-पुणे-नाशिक या मार्गावर दररोज 24 फेर्‍यांद्वारे सेवा देणार्‍या शिवनेरी बसला परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागाकडून मंगळवारी अखेरचा निरोप देण्यात आला. शिवनेरीच्या जागेवर सोळा ‘शिवशाही’ बसेस प्रवासी वाहतूक करत आहेत.

नाशिक-पुणे-नाशिक या मार्गावर 12 शिवनेरी वातानुकूलित बसेस दररोज धावत होत्या. या मार्गावर दिवसाला 24 फेर्‍या शिवनेरी पूर्ण करीत होती, मात्र शिवनेरीची जागा आता शिवशाही बसने घेतली आहे. यामुळे आजपासून शिवनेरी बस या मार्गावर धावणार नसल्याचे महामंडळाच्या नाशिक विभागाच्या प्रशासकीय सूत्रांनी स्पष्ट केले.

सध्या नाशिक-पुणे मार्गावर 14 शिवशाही बसेस दिवसाला 28 ते 30 फेर्‍यांद्वारे प्रवासी वाहतूक करीत आहेत. दरम्यान, या मार्गावर प्रवासी वाहतूक करणार्‍या निमआराम वर्गातील ‘हिरकणी’लाही महामंडळाने विश्राम दिला आहे. एकूण 27 निमआराम बसेस या मार्गावरील थांबवण्यात आल्या आहेत. एकूणच नाशिक-पुणे प्रवास करणार्‍या प्रवशांना ‘शिवशाही’चा एकमेव आधार महामंडळाकडून उपलब्ध करून देण्यात आला आहे.

एसटी प्रशासन उत्पन्न व प्रवासी वाढवण्यासाठी विविध उपक्रम, योजना राबवत आहे. खासगी प्रवासी वाहतूकदारांसोबत स्पर्धा करताना प्रवाशांना अत्याधुुनिक स्वरुपाच्या बसेसमधून प्रवास करता यावा यासाठी महामंडळाने शिवशाही बसेस सुरू केल्या. अत्याधुनिक सुविधा मात्र भाडे शिवनेरीच्या तुलनेत अर्धेच असल्याने या शिवशाही बसेसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता लक्षात घेऊन महामंडळाने ‘शिवनेरी’ बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र हिरकणी तसेच इतर निमआराम गाड्या बंद केल्याने गरीब प्रवशांचे हाल होत असल्याची ओरड आहे.

LEAVE A REPLY

*