जाचक अटी लादलेल्या शासन आदेशाची अकोलेत होळी

0
अकोले(प्रतिनिधी)- राज्य शासनाच्या शेतकरी कर्जमाफी धोरणाचा एक भाग म्हणून दहा हजार रुपये कर्ज तातडीने देण्याचा निर्णय घेण्यात आला याशिवाय कर्जमाफी संदर्भात सरकारने अनेक जाचक अटी व निकष असलेला अध्यादेश वारंवार काढून शेतकर्‍यांची फसवणूक केली. त्याच्या निषेधार्थ काल बुधवारी दुपारी येथील तहसील कार्यालया समोर शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीचे राज्य संयोजक व किसान सभेचे प्रदेश सर चिटणीस डॉ.अजित नवले यांच्या उपस्थितीत जाचक अटी लादलेल्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.
कर्जमाफीसाठी सुकाणू समितीला राज्य शासनाच्या वतीने प्रस्ताव सादर करण्यात आला.या प्रस्तावामध्ये अनेक अटी व मर्यादा लादण्यात आल्याने सुकाणू समितीने हा प्रस्ताव नाकारत संकटग्रस्त व गरजू शेतकर्‍यांचे संपूर्ण कर्ज माफ करण्याची मागणी केली आहे. जाचक अटी लादलेल्या शासनादेशाची होळी करून सुकाणू समितीने मुंबई येथे सह्याद्री समोर निषेध व्यक्त केला होता. काल बुधवारी संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामपंचायती व तहसील कार्यालयांसमोर या आदेशाची होळी करण्याचे आवाहन सुकाणू समितीने शेतकर्‍यांना केले होते.त्याचाच एक भाग म्हणून अकोले तहसील कार्यालया समोर होळी केली गेली.
संकटग्रस्त व गरजू शेतकर्‍यांना संपूर्ण कर्जमाफी द्या व कर्जमाफीसाठी एक लाखाची मर्यादा मागे घ्या,संपूर्ण कर्ज माफ करा. 30 जून 2017 पर्यंत कर्ज फेडू न शकणार्‍या थकीत बिगर थकीत सर्व कर्जदारांना कर्जमाफी द्या, कर्जासाठी जाचक अटी लावण्याचे कारस्थान थांबवा, नव्या हंगामासाठी सर्व शेतकर्‍यांना पुरेसे नवे कर्ज तातडीने उपलब्ध करून द्या, अशा मागण्या शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीचे महाराष्ट्र संयोजक व राज्य किसान सभेचे सर चिटणीस डॉ.अजित नवले यांनी यावेळी बोलताना केल्या आहेत.
प्रास्ताविक अगस्ती कारखान्याचे संचालक महेश नवले यांनी केले. यावेळी राष्ट्रवादीचे तालुका सरचिटणीस यशवंत आभाळे, राहुल देशमुख, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सोन्याबापू वाकचौरे, जेष्ठ नेते भाऊसाहेब दादा नवले, विलास आरोटे, आरिफ तांबोळी, भाकप चे जिल्हा सेक्रेटरी वकील शांताराम वाळुंज, तालुका सेक्रेटरी लक्ष्मण नवले, माकप चे वकील ज्ञानेश्वर काकड, शेतकरी कार्यकर्ते खंडू वाकचौरे, रोहिदास धुमाळ, निलेश तळेकर,संभाजी ब्रिगेडचे डॉ.संदीप कडलग,सोमनाथ नवले, मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष लालु दळवी, नानासाहेब दळवी, सेनेचे तालुकाप्रमुख मच्छिन्द्र धुमाळ, वकील संभाजी फापाळे, शिवाजी नेहे, संतोष वाकचौरे आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

*