कर्जमाफीसाठी जाचक अटी; शेतकर्‍यांत संताप

0
आरडगाव, कोपरेत अध्यादेशाची होळी; खुसडगावात सोसायटीला टाळे ठोकले

आरडगाव (वार्ताहर) – शासनाने शेतकर्‍यांना देऊ केलेल्या कर्जमाफीची घोषणा फसवी असून याचा शेतकर्‍यामधून संताप व्यक्त होत आहे. शासनाने काढलेला अध्यादेश चुकीचा असून या अध्यादेशाची राहुरी तालुक्यातील आरडगाव व कोपरेत होळी करण्यात आली. तर तालुक्यातील खुसडगाव येथे सोसायटीच्या कार्यालयाला टाळे ठोकण्यात आले.

शासनाने सरसकट कर्जमाफी देऊ केली असताना चुकीच्या पद्धतीने केलेली कर्जमाफी शेतकर्‍यांना अमान्य आहे. या शासनाच्या धोरणाचा शेतकर्‍यामधून संताप व्यक्त केला जात आहे. शासनाने काढलेल्या शासकीय अध्यादेशाची राहुरी तालुक्यातील आरडगावसह परिसरातील शेतकर्‍यांनी होळी करून या निर्णयाला विरोध दाखविला आहे.

राहुरी तालुक्यातील आरडगाव येथे डॉ. तनपुरे कारखान्याचे संचालक रवींद्र म्हसे, कृषिउत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक सुनील मोरे, अनिल इंगळे, सोसायटीचे अध्यक्ष प्रल्हाद काळे, पोपट झुगे, बाळासाहेब म्हसे, लक्ष्मण जाधव, नंदकुमार तांबे, केशव शेलार, जयदीप लोखंडे, डॉ. जालिंदर देशमुख, विजय हुसळे, डॉ. सचिन खुरूद, बाळासाहेब भुसारे, दत्तात्रय म्हसे, तुषार पेरणे, आबासाहेब गागरे, बाळासाहेब झुगे, गोविंद धसाळ, सोपान काळे, रमेश कड, आदी शेतकरी उपस्थित होते.

भातकुडगाव फाटा येथे रास्ता रोकोचा इशारा

बक्तरपूर (वार्ताहर) – महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेली कर्जमाफीची केलेली घोषणा फसवी आहे. कर्जमाफीला किचकट निकष लावण्याचा प्रयत्न केला जात असल्याने शेवगाव तालुक्यातील बक्तरपूर परिसरातील शेतकर्‍यांनी या घोषणेचा निषेध केला आहे. तातडीने शेतकर्‍यांना सरसकट कर्जमाफी द्यावी. कर्जमाफीसाठी कोणतेही निकष लावू नये अन्यथा रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा बक्तरपूर परिसरातील शेतकर्‍यांनी दिला आहे.
शासनाने अल्पभूधारक शेतकर्‍यांचे सरसकट कर्ज माफ करण्याची घोषणा केली. त्याचबरोचर शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी 10 हजार रुपयांची उचल देण्याची घोषणाही केली. मात्र प्रत्यक्षात शासनाने शेतकर्‍यांची दिशाभूल करत कर्जमाफीला किचकट निकष लावून कर्ज माफी न देण्याचा घाट रचला आहे. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले असून शासनाने तातडीने कुठलेही निकष न लावता 30 जूनपर्यंत शेतकर्‍यांचे कर्ज सरसकट माफ करावे अन्यथा शेवगाव-नेवासा मार्गावर भातकुडगाव फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा खरेदी-विक्री संघाचे संचालक बाळासाहेब जाधव, भातकुडगावचे सरपंच शंकर नारळकर, राजेंद्र आढाव, अशोक मेरड, ज्ञानदेव खरड, अप्पासाहेब फटांगरे यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

*