कर्जमाफीसाठी आज शेतकर्‍यांचा चक्काजाम; राष्ट्रीय, राज्य महामार्गांवर रास्तारोको

0

नाशिक । आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांना तातडीने सरसकट कर्जमाफी देण्याच्या प्रश्नावर सरकार विरोधातील आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीने घेतला आहे. त्यानुसार उद्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला (दि.14) जिल्ह्यात चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे.

शेतकर्‍यांना सरसकट कर्जमुक्त करून त्यांचा ‘सातबारा’ कोरा करावा, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात या प्रमुख मागण्यांसाठी सरकारविरोधात पुन्हा एकदा एल्गार पुकारण्यात आला आहे. 15 ऑगस्टला पालकमंत्र्यांना ध्वजारोहण करू दिले जाणार नाही, असा इशारा देत सर्व ठिकाणी शेतकरीच ध्वजारोहण करतील, असेही सुकाणू समितीने स्पष्ट केले आहे.

महाराष्ट्रातील सर्व शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीने यापूर्वी पुकारलेल्या राज्यव्यापी आंदोलनाला वाढता प्रतिसाद मिळाल्याने कर्जमाफीबाबत ताठर भूमिका घेणार्‍या फडणवीस सरकारला कर्जमाफीची घोषणा करावी लागली. मात्र कर्जमाफीबाबतच्या नवनव्या अटींमुळे शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ होण्याऐवजी तो होऊ नये, अशीच तरतूद सरकारने केल्याचा आरोप शेतकरी सुकाणू समितीने केला आहे. त्यामुळे सरकारची कर्जमाफी फसवी असल्याचा आरोप शेतकरी संघटनांनी केला आहे.

‘एकच नारा, सातबारा कोरा’ अशी सुकाणू समितीची घोषणा राहील.  15 ऑगस्टला सर्व जिल्ह्यांत पालकमंत्र्यांना ध्वजवंदन करण्यापासून समिती रोखणार आहे. 14 ऑगस्टला राज्यव्यापी चक्काजाम करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे महाराष्ट्र थांबेल, असा दावा समितीने केला आहे. जिल्ह्यात सर्व राष्ट्रीय व राज्य महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. आंदोलनाला कोणतेही हिंसक वळण न लावता शांततेत विरोध नोंदवण्याचा निर्णय शेतकरी सुकाणू समितीने घेतला आहे. आपला आवाज सरकारपर्यंत पोहचवण्यासाठी आज दिवसभर आंदोलनाची रणनीती ठरवली जात होती. हे आंदोलन थोपवण्यासाठी पोलिसांकडून सुकाणू समितीच्या नेत्यांचा शोधाशोध सुरू होता. मात्र अनेकांचे मोबाई क्रमांक संपर्क क्षेत्राबाहेर असल्याचे दिसून आले.

मंत्र्यांना रोखणार  : शेतकर्‍यांच्या आर्थिक दुर्दशेला कारणीभूत असलेल्या पापी मंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण नको, एखाद्या शिपायाच्या हस्ते ध्वजारोहण केले तरी चालेल, अशी भूमिका घेत स्वातंत्र्यदिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते नव्हे तर सामान्य शेतक़र्‍याच्या हस्ते ध्वजवंदन करण्यासह शेतकरी प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी सुकाणू समितीने आंदोलनाचा इशारा दिला आहे. पालकमंत्री गिरीश महाजन यांची गाडी अडवण्याचा इशारा दिला गेला आहे.

तोडगा काढण्यासाठी धावपळ : स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी आंदोलन टाळण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा प्रयत्नशील आहे. कश्यपीप्रश्नी मुंबईत सोमवारी (दि.14) बैठक घेऊन त्यात तोडगा काढण्यासाठी धावाधाव सुरु आहे. कश्यपीच्या प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घेण्यासाठी मनपा आयुक्त राज्य शासनाला प्रस्ताव देणार आहेत. तर जागेच्या मोबदल्याबाबत जिल्हा यत्रणा मध्यस्थी करणार आहे. समृध्दी आणि शेतकरी सुकाणू समितीने आंदोलन करु नये म्हणून पोलीस व महसूल यंत्रणा नेत्यांशी चर्चा करण्यासाठी प्रयत्नशील आहे.

LEAVE A REPLY

*