शेतकरी संपात २३ कोटींची उलाढाल ठप्प

0
नाशिक | दि. ३१ प्रतिनिधी-  जिल्ह्यातील भाजीपाल्याचे आगर असलेल्या नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीसह सतरा बाजार समितींत शेतकरी संपाला आज शंभर टक्के पाठिंबा मिळाला. आज जिल्ह्यातील १७ बाजार समितीत लिलावाची प्रक्रिया न झाल्याने २३.५० कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली.
यात नाशिक बाजार समितीत दररोज सर्वाधिक होणारी सुमारे अडीच कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली. येथून मुंबई, गुजरात, पुणे व विदर्भ व मराठवाड्यात जाणार्‍या भाजीपाल्याच्या सुमारे १०० च्यावर ट्रक न गेल्याने या भागाला शेतकरी संपाचा मोठा फटका बसला.

राज्यातील शेतकर्‍यांचा सातबारा कोरा करा, स्वामिनाथ्न आयोगाची अंमलबजावणी करा, दुधाला ५० रुपये हमीभाव द्या, कृषिपंपांची वीज मोफत द्या, शेतकरी वर्गास ६० वर्षांनंतर पेन्शन द्या व ठिबक सिंचनासाठी १०० टक्के अनुदान द्या आदीसह नऊ मागण्यांसाठी शेतकरी संपावर गेला आहे.

या संपात नाशिक जिल्ह्यात एक हजाराच्यावर गावातील शेतकरी सहभागी झाले आहेत. संपाच्या पहिल्या दिवशी जिल्ह्यातील १७ बाजार समितीत लिलावासह कोणतेही व्यवहार न झाल्याने २३.५० कोटींची उलाढाल ठप्प झाली आहे. याचा मोठा फटका अडतदार व व्यापार्‍यांना बसला.

तसेच नाशिक शहरातील नाशिक कृउबा समितीत जिल्ह्यातून आणि बाहेरील राज्य व जिल्ह्यातून एकही भाजीपाल्याचे वाहन पोहचू शकले नाहीत. येथील बाजार आवारात प्रामुख्याने जिल्ह्यातील बहुतांशी तालुके, शेजारील नगर जिल्हा, गुजरातमधील काही जिल्हे, मध्यप्रदेशातील काही जिल्ह्यातून फळे, शेतीमाल व भाजीपाला येतो.

या सर्व शेतमालाचा लिलावातून येथे सुमारे दोन ते अडीच कोटी रुपयांची दररोज उलाढाल होते. ती आज होऊ शकली नाही. याचा मोठा फटका व्यापारी व अडतदारांना बसला. दररोज गजबजणार्‍या बाजार आवारात आज शुकशुकाट बघायला मिळाला. केवळ अडतदार व पोलीस दिसून आले. असेच चित्र जिल्ह्यातील बाजार समितीत दिसुन आले.

LEAVE A REPLY

*